आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वैशाली येडे लढणार यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून


- प्रहार जनशक्ती पक्षाने दिली उमेदवारी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ : 
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील  वैशाली येडे यांना प्रहार जनशक्ती पक्षाने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी आज   पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी उमेदवार वैशाली येडे याही उपस्थित होत्या. जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ही वैशाली येडे याना मान देण्यात आला होता. 
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगाने नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, या भूमिकेतून आमदार बच्चू कडू यांनी वैशाली येडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रमोद कुदळे यांनी यावेळी दिली.
वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या सध्या कळंब तालुक्यातील राजूर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. तसेच ‘तेरवं’ या नाटकात त्या मुख्य भूमिकेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ऐनवेळी उद्घाटक म्हणून निवड झालेल्या वैशाली येडे यांनी शेतकरी विधवा महिलांचे प्रश्न, कुटुंबाच्या समस्या निर्धास्तपणे मांडल्या होत्या. त्यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत प्रहारतर्फे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येत आहे. गुरुवारी आमदार बच्चू कडू व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट व चर्चा झाल्यानंतर वैशाली येडे यांनी प्रहारचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मान्य केला. राजकारण म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे म्हणून लढणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना वैशाली येडे यांनी दिली.

प्रहार जनशक्ती पक्ष लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवणार असून वैशाली येडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारसंघातील एकमेव उमेदवार राहतील, असे कुदळे यावेळी म्हणाले. २५ मार्चला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येऊन देशी दारू दुकानासमोर दूध वाटप करून आणि रक्तदान करून येडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी मतदनीस असलेल्या वैशाली येडे यांच्या मुलांची व त्यांच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी प्रहारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात यवतमाळ- वाशीम लोकसभा आणि दुसऱ्या टप्प्यात जालना मतदारसंघातूनही प्रहारचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बच्चू कडूही येथून लढतील, असे संकेत त्यांनी दिले.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-23


Related Photos