महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरतांना काळजी घ्यावी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कोणतेही किटकनाशक हे मनुष्य प्राण्यांच्या तसेच इतर जिविताकरीता अपायकारक प्रसंगी प्राणघातक असते. त्यामुळे पिकांवर किटकनाशकाची फवारणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. किटकनाशकाच्या डब्यासह घडीपत्रिकेमध्ये किटकनाशकांच्या दुष्परीणामावर करावयाच्या उपाययोजना छापलेल्या असतात. त्यांचे वाचन करुन सावधानी बाळगावी, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. किटकनाशकाचे द्रावण तयार करतांना काठी किंवा डाव वापरुन पाण्यात निट मिळसावे. फवारणीचे द्रावण तयार करण्यापासून फवारणी पुर्ण होईपर्यंत डोळ्यावर चष्मा, हातामध्ये रबरी हातमोजे व तोंडावर मास्क अथवा उपरणे गुंडाळणे आवश्यक आहे. सर्दी, पडसे व ताप असल्यास फवारणी करु नये. फवारणीचे काम बालकावर सोपवू नये. फवारणी वारा शांत असतांना व वाऱ्याच्या दिशेने सकाळी किंवा सायंकाळी करावी. तीव्र उन्हात किंवा हवा असतांना करु नये.

फवारणीचे द्रावण तयार करण्यापासून पुर्ण होईपर्यंत फवारणी करणाऱ्या व्यक्तीने खाणे, पिणे, तंबाखू, धुम्रपान करु नये. कृषि विद्यापिठ तसेच उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच किटकनाशकाचे द्रावण तयार करावे. कोणत्याही परिस्थितीत किटकनाशकाचे प्रमाण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. फुटलेले किंवा मोडके स्त्रेपंप वापरु नये. चांगल्या प्रतिचा पंप व नोझल वापरावे. फवारणी शरीरापासून लांबवर करण्याची काळजी घ्यावी. नोझल साफ करतांना फुंकर मारु नये. फवारणी झाल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धूवावे. डोके दुखणे, घाम येणे, मळमळ इत्यादी लक्षणे दिसल्यास फवारणी तात्काळ थांबवावी व फवारणी न झालेल्या मोकळ्या जागेवर सावलीमध्ये बसावे.

किटकनाशकासोबत दिलेल्या घडीपत्रिकेमध्ये दिलेली उपाययोजना करावी. त्रास होणाऱ्या व्यक्तीस मिठाच्या पाण्याचे द्रावण पिण्यास दिल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. डोळे चुरचुरत असल्यास चुकूनही डोळ्यांना हात लावू नये. बशीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात डोळा बुडवावा व डोळ्याची उघडझाप करावी. असे पाणी बदलवून दोन तिन वेळा करावे व जवळच्या डॉक्टरकडे तात्काळ उपचार घ्यावा. डॉक्टरांना घडीपत्रिका व किटकनाशकाचा डबा दाखवावा, असे कृषि विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos