चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद


-  कार्यकर्त्याशी बोलतानाची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल 
- 'मी राजीनाम्याच्या विचारात...' : अशोक चव्हाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
'माझे पक्षात कुणी ऐकत नाही ..., मीही राजीनाम्याच्या विचारात आहे', अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओक्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. आपण असे वक्तव्य केले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे कबूल केले नसले, तरी या कथित संभाषणाचा अशोक चव्हाण यांनी इन्कारही केलेला नाही. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद असून, याबाबत आपले मत उघड करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. काँग्रेसने चंद्रपूरमधून विशाल मुत्तेमवार किंवा बाळू धानोरकर यांच्या ऐवजी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 
व्हायरल झालेल्या या व्हिडिओक्लिपबाबत बोलताना अशोक चव्हाण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, की 'त्या कार्यकर्त्याशी झालेले ते माझे खासगी संभाषण आहे. ते संभाषण सार्वजनिक करणे चुकीचे आहे. तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता होती. त्याचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी ती क्लिप ऐकलेली नाही. ती जरी क्लिप असली, तरी देखील चंद्रपूरमध्ये अनेक वादाचे विषय आहेत हे मान्य करायलाच हवे. चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेला वाद मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेला आहे'. 
काँग्रेसने रात्री उशिरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राज्यातील ५ नावांचा समावेश आहे. काँग्रेसने या यादीत चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीसाठीही पक्षातून जोरदार प्रयत्न केले जात होते. शिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे चंद्रपूरमधून शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-23


Related Photos