भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार खासदारांना डच्चू


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  लोकसभा उमेदवारांची  दुसरी यादी भाजपने  प्रसिद्ध केली असून यामध्ये महाराष्ट्रातील  ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यामधून भाजपने अनिल शिरोळे यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरववठामंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ६ उमेदवारांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भाजपने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

जळगांव- स्मिता उदय वाघ (विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचा पत्ता कट)
नांदेड- प्रताप पाटील-चिखलीकर
दिंडोरी- भारती पाटील (विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट)
पुणे- गिरीश बापट – (विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट)
बारामती- कांचन कुल – (आमदार राहुल कुल यांच्या पत्नी)
सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी (विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट)

पुण्यामध्ये खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी संजय काकडे यांनी बरीच धडपड केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची धमकीही दिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समजावत काँग्रेसच्या दारातून परत आणलं होतं. या मतदारसंघात बापट यांना उमेदवारी देण्याबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. बापट यांच्या नावाला काकडे यांचा विरोध होता. ज्यामुळे पुणे भाजपमध्ये धुसफूस सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केल्यानंतर काकडे यांनी तलवारी म्यान केल्या आणि बापट यांची उमेदवारी घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला.
भाजपच्या  मध्यवर्ती निवडणूक समितीची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर भाजपने त्यांच्या एकूण ३६ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. ईशान्य मुंबईचा उमेदवार भाजपने अध्याप जाहीर केलेला नाहीये. ज्या नावांची पहाटे २ वाजता घोषणा करण्यात आली त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांचा समावेश आहे.    Print


News - World | Posted : 2019-03-23


Related Photos