महत्वाच्या बातम्या

 जनावरांसाठी रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : ५ जुलै २०२३  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामार्फत  शेतकऱ्यांसाठी आंत्रविषार गाय वर्ग, म्हैस वर्गाकरीता घटसर्प व बुसेलोसीस या रोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. आंत्रविषार घटसर्प हे रोगामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे वेळेत रोगप्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. जनावरांना रोगापासून वाचवण्यासाठी पशुवैद्यकिय दवाखाना अंतर्गत लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके यांनी केले आहे.

घटसर्प रोगाची साथ उद्भवल्यास जनावरांना विव्र ताप, श्वास घेतांना त्रास होतो तसेच गळ्या खाली व पायाखाली सुज येते जनावरांच्या नाकातून पाणी वाहतो व त्यामुळे जनावरांचा गुदमरुन मृत्यु होतो. ब्रुसेलोसीस या आजारात जनावरांमध्ये प्रजनन समस्या उदा. गर्भपात, मृत जन्म, बंध्यत्व इत्यादी समस्या दिसून येतात.

आंत्रविषार हा आजार सर्व वयोगटातील शेळया मेंढयाना होतो. परंतु लहान करडे व कोकरांमध्ये मृत्यूदर अधिक प्रमाणत दिसून येतो. हा आजार कमी कालावधीचा आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते बारा तासात मृत्यू होतो. शेळया मेंढयांना निस्तेज दिसतात, एका जागेवर बसून राहतात, दूध पीत नाही. पातळ हिरव्या रंगाची संडास करतात, तोंडास फेस येतो, फिट येते, मान वाकडी होवून त्यांचा मृत्यू होतो. मोठया शेळया मेंढया तीव्रतेनूसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात. व शेळया मेंढयांचा मृत्यू होतो.

सर्व लसी जिल्हयातील पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये उपलब्ध असून जनावरांना पशुवैद्यकाकडून लसीकरण करुन घेण्यात यावे. लसीकरणानंतर जनावरांना भरपूर पाणी पाजावे मोठ्या जनावरांना एक दिवसाची विश्रांती द्यावी. त्यांना चागल्या प्रकारचे वैरण व पशुखाद्य द्यावे. घटसर्प, ब्रुसेल्ला व आंत्रविषार या रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी जनावरांना पशुवैद्यकिय दवाखाना अंतर्गत लस टोचून घ्यावी.





  Print






News - Nagpur




Related Photos