महत्वाच्या बातम्या

 शिक्षण हे प्रगतीचे द्वार प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासींचे निसर्गाशी वर्षानुवर्षांचे नाते आहे. निसर्गाशी जुळवून घेत त्यांनी जीवन जगण्याची कला साध्य करत आपली संस्कृती व परंपरा जपली आहे. गोंडवाना विद्यापीठातील विविध उपक्रमांतून आदिवासी मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे द्वार असून प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करुन प्रगती करावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

येथील गोंडवाना विद्यापीठात दहावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात ५ जुलै रोजी सकाळी पार पडला. यावेळी राज्यमाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांची उपस्थिती होती. सकाळी पावणे अकरा वाजता मान्यवरांचे मंचावर आगमन झाले. तत्पूर्वी विद्यापीठ परिसरातून कार्यक्रमस्थळापर्यंत शैक्षणिक शोभायात्रा काढण्यात आली होती.

कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अमित रामरतन गोहणे, अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे, हलामी लोकेश श्रीराम, अन्सारी सदाफ नसीफ अहमद, संतोष प्रकाश शिंदे व सारिका बाबूराव मंथनकार या गुणवंतांचा सुवर्णपदक पटकावल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पदवीप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गोगाव (अडपल्ली) येथील १७७ एकरवरील नियोजित विद्यापीठ कॅम्पसच्या कोनशिलेचे व्हर्च्यूअल पध्दतीने अनावरण करण्यात आले.

राज्यपाल रमेश बैस यांनी सुवर्णपदकविजेत्या व दीक्षांत समारंभात गौरविलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक रहा, असा उपदेश केला. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरासह कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

गडचिरोलीत विमानतळासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली हा जल, जमीन, जंगल याबाबतीत संपन्न जिल्हा आहे. येथे लोहखनिजासह बांबू व इतर वनउपज मोठ्या प्रमाणात आहेत. नवीन स्टील कंपन्या येत आहेत, २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापुढेही उद्योग, व्यवसाय वाढावेत व इथल्या साधन, सामुग्रीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. लवकरच विमानतळासाठीही प्रयत्न करु. माओवाद्यांचा प्रभाव आता कमी होत आहे, त्यामुळे जिल्ह्याची प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेसाठी पाठपुरावा सुरु -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१४ पूर्वी गडचिरोलीत दळणवळणाचा मोठा प्रश्न होता. तेव्हा केवळ ९२ किलोमीटर महामार्ग होता, आता महामार्गांचे जाळे तयार झाले आहे. २०२४ पूर्वी १० हजार किलोमीटरपर्यंत जिल्ह्यात महामार्गाचे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग, प्रकल्पासाठी येथे वाव आहे. त्यासाठी रेल्वे आवश्यक असून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos