छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रस्थापितांना धक्का , दहाही खासदारांचे तिकीट कापले


वृत्तसंस्था / रायपूर  :   भाजपने छत्तीसगड राज्यात लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का दिला आहे. येथील सर्व विद्यमान १० खासदारांना लोकसभेकरीता पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेत नवीन चेहर्‍यांना संधी  देण्याचे भाजपने जाहीर केले आहे. 
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  भाजपचा दारुण पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर प्रस्थापितांना तिकीट न देण्याचे भाजपने ठरविले आहे.यात माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या मुलाचाही समावेश आहे.  याबाबत छत्तीसगड भाजपचे प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल जैन यांनी म्हटले की, भाजपच्या सर्व १० खासदारांना पुन्हा तिकीट न देता नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.  दरम्यान, अद्याप भाजपने छत्तीसगडमध्ये उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंग यांचे पुत्र अभिषेक सिंग हे राजनांदगाव येथील खासदार आहेत. सर्व प्रस्थापित १० खासदारांना तिकीट न देण्याचा निर्णय झाल्याने माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, अभिषेक यांच्या ऐवजी त्यांचे वडील रमन सिंग यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.    Print


News - World | Posted : 2019-03-21


Related Photos