मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू


- पाकिस्तानवर अमेरिकेच्या मदतीने दबाव 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
लोकसभा निवडणुकीच्या मोसमात मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असल्याचे समजते. दाऊदला भारताच्या हवाली करण्यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेच्या मदतीने दबाव आणला जात असून तसे घडल्यास लोकसभा निवडणुकीला नाट्यमय कलाटणी लागण्याची शक्यता आहे. 
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमला कराचीमधून रावळपिंडी येथे एका अतिशय सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दाऊद रावळपिंडीमध्ये आयएसआयच्या संरक्षणात राहात असून भारतीय गुप्तचर संस्थांना दाऊदच्या नव्या निवासस्थानाची माहिती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध खरोखरच ठोस कारवाई करायची असेल तर त्यांनी दाऊदला भारताच्या हवाली करुन सुरुवात करावी, अशी भूमिका भारताने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
दाऊदला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकी तपास संस्था एफबीआयचे अधिकारी, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) आणि गुप्तचर खात्याच्या मदतीने सुमारे पावणेतीनशे पानांचा दस्तावेज तयार केला आहे. दाऊद सध्या राहात असलेले नेमके ठिकाण तसेच आयएसआयकडून त्याचा होत असलेला वापर आदींची अद्यावत माहिती या दस्तावेजात असल्याचे समजते. 
दाऊद इब्राहिमला भारतात येण्याची इच्छा असून मुंबईतील सुरक्षित आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात यावे, अशी पूर्वअट दाऊदने घातली असल्याचे यापूर्वीही त्याच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा गुन्हेगार दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहात असून आता तो पाकिस्तानला डोईजड झाला आहे. पण भारताशी मोठी वाटाघाटी झाली तरच पाकिस्तान दाऊदला भारताच्या हवाली करेल, असे समजते. दाऊद इब्राहिमला भारतात आणले जाणार असल्याचा दावा पाच वर्षांपूर्वी यूपीए सरकारमधील गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही केला होता. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांच्या घटनेनंतर बॅकफूटवर गेलेल्या पाकिस्तानवर दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी दबाव आणला जात असून त्यात अमेरिकेची सक्रिय भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारताशी शांततेच्या वातावरणात चर्चा करायची असेल सर्वप्रथम दाऊदला स्वाधीन करा, अशी भूमिका मोदी सरकारने घेतली असल्याचे समजते. येत्या काही आठवड्यात दाऊदला भारतात आणण्यात मोदी सरकारला यश मिळाल्यास त्याचा सर्वात मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-03-21


Related Photos