होळीपौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचे दर्शन


वृत्तसंस्था / पुणे :   बुधवार २० मार्च रोजी होळीपौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने यावेळी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. हे या वर्षातील अखेरचे सुपरमून दर्शन असेल. 
चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर, चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. बुधवार २० मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५९ हजार ३७७ किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे चंद्र अधिक प्रकाशमान दिसेल. होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सायं. ६ वाजून १३ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन गुरुवारी सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी पश्चिमेला मावळणार आहे, अशी माहिती खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. यापूर्वी १९ मार्च २०११ रोजी होळीपौर्णिमा आणि सुपरमून असा योग आला होता. आता यानंतर नऊ वर्षांनी १० मार्च २०२८ रोजी पुन्हा होळी पौर्णिमा आणि सुपरमूनचे दर्शन असा योग येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.    Print


News - Rajy | Posted : 2019-03-19


Related Photos