गडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार


  - जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  चिमूर - गडचिरोली लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण  ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३ लाख ९० हजार ९४६ पुरुष मतदार तर ३ लाख ७८ हजार ४९८ महिला मतदार आहेत. यासाठी  ९३० मतदान केंद्रे आहेत.  ग्रामीण भागात ७७७ तर शहरी भागातील मतदारांना १५३ मतदान केंद्रावर मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे.  आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी यापुर्वीच लागू झाली असून आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येणार आहे.  मतदारांनी  दारु, पैसे किंवा कोणत्याही स्वरुपातील भेटवस्तू  अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी  न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन सिंह यांनी केले. 
 मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे.  जिल्ह्यात १९०५ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.  महिलांना तसेच अपंग व्यक्तीना मतदानाचा हक्क बजावता यावा यावर भर देण्यात येत असून मतदानासाठी दिव्यांग व्यक्तीनीं वाहनाच्या मदतीची मागणी केल्यास त्यानुसार ते पुरविण्यात येईल.  अशी माहितीही यावेळी देण्यात आली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos