गुन्हेगार उमेदवारांना गुन्ह्य़ांची माहिती जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करणे बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
गुन्हेगार उमेदवारांसाठी कठोर नियम तयार करण्यात आले असून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती अर्ज दाखल केल्यापासून मतदानापर्यंत तीन वेळा वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे . 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदान केंद्राबाहेर फलकावर ठळकपणे लावण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम वाखाणला गेला होता. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात लोकसभा निवडणुकीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारी कारवायांची माहिती वृत्तपत्रात तीन वेळा जाहिरात स्वरूपात प्रसिद्ध करावी, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
उमेदवारांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्राद्वारे आपली सांपत्तिक स्थिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी लागते.  लोकसभेच्या उमेदवारांनी आपल्यावरील गुन्ह्य़ांची माहिती मतदान होईपर्यंत वृत्तपत्रांत तीनदा प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि पार्श्वभूमीच्या उमेदवारांची आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती नागरिकांना सहजपणे मिळणार आहे. उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्य़ांच्या माहितीची जाहिरात करावी लागणार असल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची संपूर्ण पार्श्वभूमी मतदारांना कळणार आहे. त्याचा उपयोग अधिकाधिक चांगले उमेदवार निवडण्यासाठी मतदारांना होईल, असे सह-मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी सांगितले.
   Print


News - Rajy | Posted : 2019-03-18


Related Photos