गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक : पहिल्या दिवशी ६ उमेदवारांनी घेतले अर्ज


- जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
- निर्भीडपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामांन दाखल करण्याच्या आज १८ मार्च रोजी पहिल्या दिवशी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज खरेदी केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. सहापैकी एकाही उमेदवाराने आज नामांकन दाखल केलेले नाही.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज  निवडणूकीसंदर्भात माहिती दिली.  जिल्ह्यात दारूमुक्त निवडणूक पार पाडण्यासंदर्भात मागील आठवड्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे , सर्चचे डाॅ. अभय बंग यांच्यासोबत बैठक पार पडली असून नागरीकांनी दारूच्या प्रलोभनाल बळी पडू नये, कोणत्याही उमेदवाराकडून दारू, पैसे, वस्तूंचे प्रलोभन दाखविल्या जात असल्यास निवडणूक विभागास माहिती द्यावी , भयमुक्त वातावरणात निवडणूकीत मतदान करावे, विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 
निवडणूकीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ॲपद्वारे नागरीकांना तक्रार नोंदविता येईल. सबंधितांना प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्याच्या सुचना देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले. जिल्ह्यात आचारसंहीतेचे पालन केले जात आहे. प्रसिध्दीचे बॅनर, भूमिपुजन, लोकार्पणाचे फलक, जाहिरातींचे फलक काढण्यात आलेले आहेत.
निवडणूकीच्या कामासाठी गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ७०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होत असल्यामुळे २५ - २५ कर्मचाऱ्यांचे गट करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
जिल्ह्यातील अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सोपे व्हावे याकरीता ३०० ग्रामपंचायतींना व्हिलचेअर पुरविण्यात आले आहे. मतदान केंद्रापर्यंत अपंगांना पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरोदर महिला मतदारांसाठीसुध्दा विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. रॅली, दिंडी, पथनाट्य, रांगोळी आदींच्या माध्यमातून प्रसिध्दी केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.

तेंदूपत्ता लिलावाच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगास मार्गदर्शन मागविले

निवडणूकीची आचारसंहीता लागू झाल्याने तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेला स्थगिती आली आहे. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगास पत्र लिहून मार्गदर्शन मागविले असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos