महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा ही आनंद प्राप्तीची केंद्रे व्हावी : आयुक्त विपीन पालीवाल    


- मनपातर्फे सुरु करण्यात आली ४ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठ वयोगटातील नागरिकांना विरंगुळा मिळावा व त्यातून त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक हित जपले जावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ४ जागी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरु करण्यात येत असुन यातील २ विरंगुळा केंद्राचे उदघाटन शनिवार १ जुलै रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते पार पडले.  

ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पिय भाषणात घोषणा केली होती त्यानुसार महानगरपालिकेतर्फे स्वनिधीतून ही विरंगुळा केंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. तुकूम धांडे हॉस्पिटल जवळील श्री स्वामी समर्थ उद्यान तसेच रामनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे विरंगुळा केंद्र सुरु करण्यात आले असुन महानगरपालिकेतर्फे या दोन्ही केंद्रास स्मार्ट टीव्ही, चेस बोर्ड, कॅरम बोर्ड, योगा मॅट्स, ग्रीन मॅट, एअर बेंच, पुस्तके ठेवण्यास शेल्फ, टी टेबल, खुर्च्या, घड्याळ, सुचना लिहिण्यास व्हाईट बोर्ड, पाण्याच्या कॅन्स इत्यादी विविध साहीत्य उपलब्ध करून देण्यात आले.  

या परिसरात आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त यांनी सांगितले की, जी व्यक्ती मार्गदर्शन करू शकते तिला ज्येष्ठ व्यक्ती म्हणता येईल कारण अनुभवाची शिदोरी लाभलेला व्यक्तीच मार्गदर्शन करू शकतो म्हणुनच ज्येष्ठ व्यक्ती ही गुरुस्वरूपी असते. एका सर्वेक्षणानुसार जपान या देशातील नागरिक हे दीर्घायुषी असतात कारण ते अधिक सामाजिक असतात व म्हणून आनंदी असतात व पर्यायाने अधिक जीवन जगतात. तेव्हा या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातुन आपले ज्येष्ठ ही समाजाचे अभिन्न अंग असल्याचा अनुभव घेतील व  ही विरंगुळा केंद्रे आनंद प्राप्तीची केंद्रे होतील अशी आशा करूया.  

भविष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतीक, क्रीडा स्पर्धा आयोजीत करून त्यांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे तसेच शहरात निर्माण होणारे नवीन उद्यान व समाजभवन ही संस्कार केंद्रे म्हणुन उदयास येणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध मागण्या आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या त्यातील अनेक मागण्या या आयुक्तांनी मान्य केल्या असुन इतरांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.    

श्री स्वामी समर्थ उद्यान केंद्रात माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी मनपाच्या प्रत्येक अभियानात या परिसरातील नागरिकांचा सहभाग असल्याचे तसेच चंद्रपूर शहरासाठी आवश्यक त्या सर्व सहकार्यास तयार असल्याचे सांगितले. रामनगर येथील केंद्रात संगणक,विविध वाद्ये तसेच साउंड सिस्टमची मागणी करण्यात आली. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रमात तसेच सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस या दोन्ही स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रामनगर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष महादेव पिंपळकर, गोहोकार, विजय चंदावार तसेच मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थीत होते.


ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांची गरज काय : आज मनोरंजनासाठी मोबाईल टीव्ही सारखी अनेक साधने उपलब्ध आहेत, मात्र ती आभासी आहेत, गरज असते ती प्रत्यक्ष संवादाची,आपुलकीचा आधार, सुख-दुःख वाटण्याच्या हक्काच्या ठिकाणाची. या ठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र होऊन विशेष प्रसंग साजरे करतात. व्यायाम, कॅरम व बुद्धिबळासारखे खेळ, वर्तमानपत्र चाळून मनोरंजन करतात. एकमेकांशी संवाद साधुन आठवणीत रमतात. या विविध उपक्रमांमुळे आयुष्याच्या संध्याकाळी दोन-तीन तास सहज निघत असल्याने विरंगुळा केंद्रांची गरज आहे.    





  Print






News - Chandrapur




Related Photos