महत्वाच्या बातम्या

 गुरुपौर्णिमा विशेष लेख    


गुरूपौर्णिमा लेखांक : ३

गुरु आणि इतर : 

अ. शिक्षक आणि गुरु : शिक्षक ठरावीक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकावतात, तर गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्याथ्र्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्याथ्र्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकावण्यापुरताच मर्यादित असतो. 

आ. प्रवचनकार आणि गुरु : पुढील कोष्टकात प्रवचनकारांचे आणि गुरूंचे (संतांचे) बोलणे, यांतील भेद स्पष्ट केला आहे. 

इ. भगत आणि गुरु : भगत प्रापंचिक अडचणी दूर करतात, तर गुरूंचा प्रापंचिक अडचणींशी संबंध नसतो. त्यांचा संबंध शिष्याच्या केवळ आध्यात्मिक उन्नतीशी असतो.

ई. सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु : पुढील कोष्टकात सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु यांच्यातील कर्मामागील इच्छा, एकूण कर्म आणि क्रिया, तसेच कर्म आणि क्रियांचे प्रमाण दिले आहे. कर्म म्हणजे हेतुसहित कृति, तर क्रिया म्हणजे हेतुविरहित कृति. साधनेत जसजशी प्रगति होते, त्या प्रमाणात स्थूलदेह सोडून इतर देहांचे कर्म न्यून होत जात असल्याने एकूण कर्म आणि क्रिया अल्प होत जाते. 

संत आणि गुरु : 

संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु फक्त निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्‍यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते, परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच, मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात. 


गुरूपौर्णिमा लेखांक : ४ 

ईश्वर आणि गुरु :

अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप व ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप. 

१. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की ती ईश्वरालाच पोहोचते. 

२. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ही जागा वामनपंडितासाठी आहे, कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे. हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना, म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले. 

पंडित  : डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ? 

ईश्वर  : तो अधिकार गुरूंचा आहे. 

पंडित  : गुरु कोठे भेटतील ? 

ईश्वर  : सज्जनगडावर. 

त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला. 

पंडित  : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ? 

स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की! 

पंडित  : मग ईश्वराने डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा, असे का म्हटले ? 

स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला! 


संकलक : श्रीमती विभा चौधरी 

संपर्क : ७६२०८३१४८७

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ गुरुकृपायोग





  Print






News - Editorial




Related Photos