महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये


- कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सोयाबीन पिकावर खोडमाशी, बुरशीजन्य रोग तसेच तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत नियंत्रणात आणण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे जैविक खते उत्पादन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सोयाबीन गटाचे व चवळी गटाचे रायझोबियम, स्फुरद विरघडविणारे जिवाणू व ट्रायकोडार्मा विक्रीस उपलब्ध आहेत. याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा असे, आवाहन करण्यात आले आहे.

पिकाच्या रोपावस्थेत पोषक वातावरणामुळे जास्त पाऊस, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचल्यामुळे मुळकुज व खोडकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतांना दिसतो. त्यामुळे जमीनिमार्फत होणाऱ्या रोगांच्या बुरश्या पोषक वातावरणामुळे जमिनीमध्ये वाढतात व त्या ५ ते ७ वर्ष जगतात. त्यानंतर पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ह्या बुरश्यांचा पिकांवर प्रादुर्भाव होतांना दिसतो. सोयाबीन पिक रोपावस्थेत असतांना उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस, व त्यानंतर कोरडे वातावरनामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अश्या किडी व रोगांचे प्राथमिक अवस्थेत कमी खर्चात बीजप्रक्रिया करून व्यवस्थापन करता येते. तसेच जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपांची वाढ जोमाने होते, उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढते. बीजप्रक्रिया करतांना पिकनिहाय शिफारशीनुसार प्रथम रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशकाची व सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवल्यानंतर पेरणी करावी.

सोयाबीन पिकासाठी बीजप्रक्रिया करतांना कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के (संयुक्त बुरशींनाशक) ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे त्यानंतर थायामेथोक्झाम ३० टक्के एफ.एस. (पोलोगोल्ड, स्लेयर प्रो, टाटा ट्राँट) या कीटकनाशक १० मिलि प्रती किलो बियाणे त्यानंतर जिवाणू संवर्धक रायझोबियम जापोनिकम अधिक स्फुरद विरघडविणारे जिवाणू (पी.एस.बी.) व त्यानंतर ट्रायकोडार्मा या बुरशीनाशकाची बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावी. तूर पिकासाठी बीजप्रक्रिया करतांना कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के (संयुक्त बुरशींनाशक) ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे त्यानंतर जिवाणू संवर्धक रायझोबियम अधिक स्फुरद विरघडविणारे जिवाणू (पी.एस.बी.) व त्यानंतर ट्रायकोडार्मा या बुरशीनाशकाची बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावी, असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Aurangabaad




Related Photos