खुर्ची हे आमचे स्वप्न नाही, तर देश हे आमचे स्वप्न : उद्धव ठाकरे


-  शिवसेना - भाजपाची युती भगव्यासाठी !
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शाहरुख मुलाणी/ नागपूर :
खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे शिवसेना भाजपाची युती ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी झाली आहे भगव्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला देशप्रेम शिकवू नये, असा टोला हाणत त्यांनी पाकड्यांना धडा शिकवा असे आवाहनही केले महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त करीत ठाकरे यांनी युतीच्या निवडणूक प्रचाराचा राज्याच्या उपराजधानीत शंखनाद केला. आम्ही मतदारसंघ आणि माणसही जिंकतो, असेही ठाकरे म्हणाले.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तोफ डागली. पाकिस्तानचा क्रीकेटर पंतप्रधान होतो, तर आपल्याकडे पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणारे नेते क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होतात, असा टोला नाव न घेता ठाकरे यांनी शरद पवार यांना हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात कामे झाली. काही उणीवा होत्या, त्यासंदर्भात आम्ही आवाज उठविला. त्यावर सरकारने विचार केला. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही युती केली. शिवाय काही लोक पंतप्रधान मोदींवर टीक करतात. त्यांना मोदी परवडत नाही, अशांनी मग दुसरा प्रकाश दाखवावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. आम्हीही हृदयापासूनच युतीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आम्ही खरं प्रेम करणारे लोक आहोत, कार्यकर्त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता एकदिलाने कामाला लागावे. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. काँग्रेस - राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपत येत आहे, त्यावर ठाकरे शैलीत टिपण्णी उद्धव ठाकरे यांनी केली. समोर ठेवा कुणीतरी नाही तर आपण दाणपट्टा काय हवेतच गरागरा फिरवायचा का ? मोदींनी सर्वांना घ्यावे पण शरद पवारांना घेऊ नये, नितीनजी मोदींना हे सांगा, असे ठाकरे म्हणाले. व्यासपिठावर बसलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कटाक्ष करीत रावसाहेब चिंता करू नका मी अर्जुनला (अर्जुन खोतकर) सांगतो, असे ठाकरे यांनी सांगतातच सभागृहात एकच हशा पिकला.
शिवसेना भाजपा युतीचा स्नेहमेळावा नागपूरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते व विदर्भाचे समन्वयक दीपक सावंत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती यांच्यासह भाजपा शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी आमदार, खासदार उपस्थित होते.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-15


Related Photos