महत्वाच्या बातम्या

 गुरुपौर्णिमा (व्यासपूजन) विशेष


प्रस्तावना : मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रस्तुत लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच हा उत्सव साजरा करण्याची पद्धत पहाणार आहोत.प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात. यावर्षी गुरुपौर्णिमा ३ जुलै रोजी आहे. प्रस्तुत लेखातून गुरुपौर्णिमेचे महत्व जाणून घेऊन त्या प्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करूयातआणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूया.


गुरुपौर्णिमा साजरी करण्याची तिथी : गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. (तामिळ प्रदेशात व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस साजरा करतात.)

गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील उद्देश : गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे महत्व : 1). गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत 1 सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा  आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत 1 सहस्र पटीने लाभ होतो. म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

2). गुरु-शिष्य परंपरा ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !

गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत : प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे, म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.

गुरुपूजनाचा विधी : स्नानादी नित्यकर्मे आटोपून गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये। असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षि व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरु आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. यानुसार गुरुपौर्णिमा साजरी करावी.  


गुरूंचे महत्त्व : 


या जन्मातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही प्रत्येक जण शिक्षक, डॉक्टर वकील वगैरे दुसर्‍या कोणाचे तरी मार्गदर्शन घेतो. मग जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ति देणार्‍या गुरूंचे महत्त्व किती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. पुढील सूत्रांंवरून ते महत्त्व स्पष्ट होईल. 


अ)  मानसशास्त्रदृष्ट्या :


1. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि सामथ्र्याची चुणूक न दाखवणार्‍या देवांपेक्षा, शिष्याच्या उन्नतीसाठी या गोष्टी दाखवणार्‍या गुरूंकडे शिष्याचे लक्ष जास्त प्रमाणात वेंâद्रित होऊ शकते.

2. गुरूंना अंतज्र्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.

3. शिष्याला शिकवण्याऐवजी बाबा असे काय बोलतात ?, असे काही अभ्यासू साधकांना वाटते. त्याविषयी विचारले असता बाबा म्हणाले, मला भजी किंवा थालीपीठ आवडते असे म्हणतो, त्यामुळे एखादा शिष्य घरी भजी किंवा थालीपीठ करतो तेव्हा त्या वेळी तरी त्याला माझी आणि नाम घ्यायची आठवण होते.

4. स्वतःच्या गुरु पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात. 


आ) अध्यात्मशास्त्रदृष्ट्या : 

1. गुरूंकडे जाणे : गुरु शिष्याला आपली आठवण करून देतात; मगच शिष्य गुरूंकडे जाऊ शकतो.

2. संकटांचे निवारण : काही भक्त मानवी स्वभावाला अनुसरून, प्रापंचिक दुःखे भगवंतांने दूर करावीत, या इच्छेने भगवंतांकडे जात. आईबाप जसे आपल्याला संकटात सांभाळतात, तसे भगवंत आपल्याला संकटातून सोडवतील, अशी त्यांची समजूत. असे भक्त पत्र लिहीत किंवा मनात भगवंतांची प्रार्थना करत. त्याचा परिणाम असा होई की, संकट तर निघून जाई किंवा संकट अटळ असले तर भक्ताच्या मनात ते सहन करण्यासाठी शांति अगर सामथ्र्य उत्पन्न होत असे. भगवंतांने तशी इच्छा केल्यामुळे असे घडत नसे, तर आपोआपच; परंतु भक्ताची श्रद्धा आणि त्याच्या शरणागतीमुळे गुरुकृपेचा जो ओघ वहात असतो, त्या कृपेमुळे हे घडून येई.

3. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढणे : मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

गुरुमहिमा

1. पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतो; म्हणून पित्यापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे.

2. एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात.

3. सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी त्याचे ।।

   आपणासारिखें करिती तात्काळ । कांही काळवेळ न लगे त्यांसी ।।

   लोह परिसासी न साहे उपमा । सद्गुरु-महिमा अगाधचि ।।

   तुका म्हणे ऐसें आंधळे हें जन । गेलें विसरून खर्‍या देवा ।।

- संत तुकाराम

4. भगवान् श्रीकृष्णांनीही सांगितले आहे की, देवभक्तीपेक्षा गुरुभक्तिच अधिक श्रेष्ठ.

 मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परि गुरुभक्तांची अति आवडी ।। - श्री एकनाथी भागवत 11:1527

 म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या भक्तांपेक्षा गुरुभक्तच मला अधिक आवडतो.

 आणि विश्वामाजी ईश्वरु । एकचि व्यापक सद्गुरु । म्हणूनि सर्वाभूती आदरु । करीती ते ।। 


 - संत एकनाथ

5. मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी, श्री तुकामार्इंच्या ठिकाणी, मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते. ते त्यांच्यापाशी मिळाले. - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’

6. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही. समर्थ रामदासस्वामींनीही दासबोधात (1.4.16) म्हटले आहे -

      शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये । म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ।।

7.    कल्पतरुची द्यावी उपमा । कल्पिलें लाभे त्याचा महिमा । न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरुचि ।। 


 श्री गुरुचरित्र ३:३५


8. गुरूंना उपमा देण्याजोगी या जगात दुसरी कोणतीही वस्तु नाही. गुरु सागरासारखे म्हणावे, तर सागराजवळ खारटपणा असतो, पण सद्गुरु सर्वप्रकारे गोड असतात. सागरास भरती-ओहोटी असते; पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो. सद्गुरु कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे, तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती पुरवितो, पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ति करून देतात, म्हणून गुरूंचे गुणवर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे.


संकलक - श्रीमती विभा चौधरी 

संपर्क – ७६२०८३१४८७

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ गुरुकृपायोग






  Print






News - Editorial




Related Photos