मागील पाच वर्षात ५० वर्षे मागे गेला गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचा विकास


- आगामी निवडणूकीत मतदार जाब विचारणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
निवडणूका जवळ आल्या की, सर्वच राजकीय पक्ष विकासाचे मुद्दे समोर करून मतदार राजाकडे मते मागण्यासाठी येत असतात. मात्र विकासाची कोणती कामे नेमकी एखाद्या क्षेत्रात आवश्यक आहेत याकडे मात्र निवडणूकीनंतर दूर्लक्ष केले जाते. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीतही नेमके तसेच दिसून येत आहे. यामुळेच मागील पाच वर्षांच्या काळात या क्षेत्राचा विकास ५० वर्ष मागे गेल्याचे दिसून येत आहे.
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा क्षेत्रात मोठमोठ्या प्रकल्पांची, विकासकामांची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कामे करण्यात आली नाहीत. कामे उशिरा सुरू केल्यामुळे अपूर्णावस्थेत आहेत. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या टप्प्याटप्प्याच्या कामांमुळे अवस्था बकाल झाली आहे. सिंचनाच्या योजना लालफितशाहीत अडकल्या आहेत. रेल्वेचे प्रश्न दरवर्षीच अडगळीत टाकले जात आहेत. यामुळे मतदार आता या निवडणूकीत नक्कीच जाब विचारू शकतात. शिक्षण, आरोग्य, सिंचन, शेतीविषयक, दळणवळणविषयक, रेल्वे, रोजगार, उद्योग हे प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही या लोकसभा क्षेत्रातील बेरोजगार रोजगाराच्या शोधात इतर राज्यात धाव घेत आहेत. लोकसभा क्षेत्रात बारमाही वाहणाऱ्या  नद्या आहेत. तरीही जुन्या प्रकल्पांव्यतिरीक्त एकही नवीन सिंचन प्रकल्प या पाच वर्षात उभा राहू शकला नाही. 
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता होती. या परिस्थितीसुध्दा लगतच्या जिल्ह्यात ज्याप्रमाणे बदल झाला त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात बदल होवू शकला नाही. अनेक कामांना मंजूरी मिळविण्यातच पाच वर्षे निघून गेली. यामुळे मंजूरी मिळालेली कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. मात्र अपूर्णावस्थेत आहेत. काही योजनांचे केवळ भूमिपूजनच करून ठेवण्यात आले आहे. यामुळे ही कामे कधी पूर्ण होतील, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावाची अवस्था आजही तशीच आहे. 
यामुळे मतदारांना विकासाची नांदी हवी असल्यास निवडणूकीच्या कालावधीत  उमेदवारांसमोर नक्कीच प्रश्न उपस्थित करतील, असे बोलल्या जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos