दारू व खर्राविक्री बंद करण्यासाठी पेसा अधिकार वापरणार


- ग्रामस्थांनी व्यक्त केला निर्धार, क्लस्टर कार्यशाळा बंदीच्या उपायांवर चर्चा 
विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / एटापल्ली :
तालुक्यातील पुरसलगोंदी येथे १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटन सदस्यांची क्लस्टर कार्यशाळा १४ मार्च रोजी घेण्यात आली. येथील गाव संघटनेच्या सदस्य कल्पना आलाम यांच्या पुढाकाराने सरपंचाच्या अध्यक्षतेत ही कार्यशाळा झाली.  दारू व खर्राविक्री बंद करण्यासाठी पेसा अधिकार वापरण्याचा निर्धार यावेळी संघटनांनी मिळून दाखविला. 
पुरसलगोंदी ही एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल ग्रामपंचायत असून इत्तुलनार, बांडे, हेडरी, मंगेर, सुरजागड, मलमपाडी, नेंडेर, गोडेली, आलेंगा, पुसुमपल्ली,येदसगोंदी, बोळमेथा ही गावे यांतर्गत येतात, अनेक गावांमध्ये अवैध दारू आणि सुगंधित तंबाखूयुक्त खर्रा मोठ्या प्रमाणात विकला जातो.  दारूमुळे गावाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. महिलांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागतो. युवक आणि शाळकरी विद्यार्थीदेखील खर्रा या पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावांतील अवैध दारु व खर्राविक्री बंदीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे ही क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. एकूण ५० सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर उडेरा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या उडेरा स, उडेरा म, आलदंडी, परसलगोंदी स, रेखनार या गावातील सदस्यांची क्लस्टर कार्यशाळा सरपंच राधा तलांडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली यात एकूण ३८ सदस्य सहभागी झाले होते. या आदिवासीबहुल गावांना मिळालेले पेसा अधिकार त्यांना सांगण्यात आले. त्या माध्यमातून दारू आणि तंबाखूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार गाव संघटनेच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर संघटन मजबूत करण्यासोबतच दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने अहिंसक कृती करण्याचे नियोजन करणार असल्याचेही संघटनांनी ठरविले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos