नरेगा च्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदावर रूजू होण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा


- दिनेश बोरकुटे यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यक्रमाच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदावर रूजू होण्यापासून हेतूपुरस्पर वंचित ठेवणाऱ्या एटापल्ली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील नरेगा कक्षातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पदावर रूजू करून घेण्यात यावे, अशी मागणी साखरा येथील दिनेश बाबाराव बोरकुटे यांनी नरेगा आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , रोहयो चे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बोरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या ३० ऑक्टोबर १८  रोजीच्या आदेशानुसार एटापल्ली पंचायत समितीमध्ये कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. यामुळे बोरकुटे हे १९ नोव्हेंबर २०१८ रोजी रूजू होण्यासाठी एटापल्ली पंचायत समितीमध्ये गेले. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी तुमची कार्यालयात कोणतीही आवश्यकता नाही, असे सांगून अपमानजनक वागणूक दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागात जावून रूजू होण्यास सांगितले. तसा शेरासुध्दा रूजू प्रतिवेदनावर लिहिला. यामुळे २० नोव्हेंबर रोजी बोरकुटे हे जिल्हा परिषदेच्या रोहयो उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकाकडे गेले. मात्र त्यांनी सदर आदेश आमच्या स्तरावरून झालेला नसल्यामुळे आम्ही या कार्यालयात रूजू करून घेवू शकत नाही, असे उत्तर दिले.  यानंतर ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पत्र देवून एटापल्ली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी  रूजू न करून घेण्याबाबतचे कारण मागविले असून त्याचा अहवाल येताच त्याबाबतचे कारण कळविण्यात येईल असे पत्र बोरकुटे यांना मिळाले. तसेच उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकांनी पत्र पाठवून ८ जून २०१८ पासून गैरहजर असल्याचे पत्र मिळाले. 
प्रत्यक्षात कोणत्याही ठिकाणी रूजू करून घेण्यात आले नाही. किंवा नरेगा व्यवस्थापन कक्षात काम करण्याबाबतचा कोणत्याही प्रकारचा लिखित आदेश किंवा पत्र प्राप्त झालेला नव्हता. मात्र जाणीवपूर्वक शासकीय नियमांचे उल्लंघन करून कोणतेही पत्र वेळेवर पाठविण्यात आलेले नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक नियुक्तीपासून वंचित ठेवत असल्याचे दिसून येत आहे. मी एक सुशिक्षित बेरोजगार असून माझ्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने हेतूपुरस्पर मला नियुक्ती न दिल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे सबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व नियुक्तीपासून वंचित ठेवलेल्या कालावधीतील मानधन देण्यात यावे आणि पुन्हा कामावर रूजू करून घेण्यात यावे, अशी मागणी दिनेश बोरकुटे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos