लोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर
: स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.
विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
 स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे, या एकमेव मागणीसाठी आणि उद्दिष्टांसह हा महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. उमेदवारांबाबत चर्चा सुरू असून उमेवारांची यादी अंतिम टप्प्यात आहे.  
माहितीनुसार विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत नागपुरातून बीआरएसपीने दावा केला आहे. त्यांच्यातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लढणार आहेत. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. त्याचप्रकारे चंद्रपूर येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप आणि बीआरएसपीचे अ‍ॅड. दशरथ मडावी, रामटेक येथून विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, यवतमाळ येथील विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. श्रीहरी अणे, आपतर्फे वसंतराव ढोके, भंडारा येथून देवीदास लांजेवार, झेड.एम. दूधकोअर गुरुजी, वर्धा येथून लोक जागर पार्टीचे कवी ज्ञानेश वाकुडकर, बुलडाणा येथून अभयसिंग पाटील आणि मेजर अशोक राऊत आदी नावांची चर्चा सुरू आहे.
 निर्माण महामंच स्वत: निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विदर्भ निर्माण महामंच हा तिसरा पर्याय म्हणून सक्षमपणे उभा राहील. विदर्भातील सर्व दहा जागा लढवण्यात येतील. आमचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. उमेदवारांची घोषणा शुक्रवारी केली जाईल, अशी माहिती विदर्भ निर्माण महामंचचे  समन्वयक राम नेवले यांनी दिली आहे. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-15


Related Photos