लगाम ग्रामपंचायतच्या मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर ॲसिड हल्ला , प्रकृती चिंताजनक


- चंद्रपूरला हलविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / मुलचेरा :
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत समाविष्ट मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतचे ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे (२५) यांच्यावर काल १४ मार्च च्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
  तालुक्यातील लगाम ग्रामपंचायत  कार्यालयात परिवर्तक म्हणून कार्यरत  समाधान कस्तुरे  हे आपल्या खोलीत झोपेत असताना काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून ॲसिड हल्ला केला. यामध्ये त्यांच्या शरीराचे बहुतांश भाग जळाले  असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांना कळताच मध्यरात्री २. २५ च्या दरम्यान त्यांना चंद्रपूर येथे हलविले. सध्या ते चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
    सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी   शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांच्याशी भ्रमणध्वनी ने संपर्क करून घटनेची माहिती घेऊन समाधान कस्तुरे यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली.
   सदर घटना ही मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ॲसिड हल्ला करणारे नेमके किती जण आहेत याची माहिती कळू शकली नाही मात्र सदर घटनेची सर्वांकडून निषेध करण्यात येत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos