निलक्रांती योजनेच्या अनुदानासाठी वृद्ध शेतकऱ्याची पायपीट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कवठी (सावली) :
सावली तालुक्यातील कवठी येथील शेतकरी काशिनाथ देवाजी घोटेकर यांनी जून २०१८ मध्ये निलक्रांती मत्सव्यवसाय योजनेंतर्गत शेततळी बांधली. शेतीपूरक व्यवसायाला चालना म्हणून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याने लाखोंचे खर्च केले, मात्र निलक्रांती योजनेच्या अनुदानासाठी वृद्ध शेतकऱ्याला शासनदरबारी पायपीट करावी लागत आहे.
शेतकऱ्यांना शेती व्यवसायसोबत इतर शेतीपूरक व्यवसाय करून आपले उत्पन्न वाढावे, मत्स्यव्यवसाय वाढावे, मत्‍स्योत्‍पादनाच्‍या माध्यमातून अन्न सुरक्षा प्रदान करुन या व्यवसायाला जागतिक पातळीवरील उद्योजकीय दर्जा प्राप्त करुन देऊन रोजगार निर्मिती करणे, मच्छिमारांचे व मत्स्यसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्याच्‍या सहाय्याने उत्पन्न दुपटीने वाढविणे हा मूळ उद्देश या योजनेचे आहे. याकरिता मागील वर्षी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त माध्यमातून निलक्रांती योजना मत्स्यविभागामार्फत राबविण्यात आली. सावली तालुक्यात एकमेव शेतकरी काशीनाथ घोटेकर यांची निवड करण्यात आली. सदर शेतकऱ्याने पंचायत समितीचे अभियंता यांचे मार्फत अंदाजपत्रक बनविले मात्र हा अंदाजपत्रक ग्राह्य न नसल्याचे सांगून पाटबंधारे विभागाकडून अंदाजपत्रक बनवायला सांगितल्याने शेतकऱ्यांनी अंदाजपत्रक बनवून ६ लाख ४५ हजार १२३ रुपयाचा खर्च करून शेततळी बनविले.  शेतकऱ्याने पायपीट करून सदर कामाचे मूल्यमापन व पूर्णत्वाचे प्रमानपत्रासह सहाय्यक आयुक्त मतसव्यवसाय चंद्रपूर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र राज्यशासनाचा निधी उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्याला वारंवार परत पाठविल्या जात आहे. शेतकऱ्याला केलेल्या खर्चाचे अनुदान न देता कर्जाच्या खाईत लोटण्याचा धक्कादायक प्रकार शासनाकडून होत असल्याचा शेतकरी आरोप करीत आहे.

अनुदान न मिळाल्यास शेतकऱ्यास घेऊन आंदोलन 

शेतकऱ्याला अनुदानाचे आमिष दाखवून योजना राबवून घेणे व त्या वृद्ध शेतकऱ्यास अनुदानासाठी पायपीट करायला लावणे ही निंदनीय व शेतकरी विरोधी शासनाचा प्रकार आहे. अनुदान न मिळाल्यास शेतकऱ्यास घेऊन आंदोलन करण्यात येईल - विजय कोरेवार, सदस्य,पंचायत समिती सावली  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-14


Related Photos