महत्वाच्या बातम्या

 पेंटिपाका-पाटीपाेचम्मा रस्त्यावर जंगली अस्वल मृतावस्थेत आढळली : अवयव गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सिराेंचा वनविभागाअंतर्गत आरडा नियत क्षेत्रातील कक्ष क्र.२९ च्या संरक्षित जंगलातील पेंटिपाका-पाटीपाेचम्मा रस्त्यावर जंगली अस्वल मृतावस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे यावेळी त्याचे पायाचे व लिंग आदी अवयव गायब असल्याचे दिसून आले.
दरम्यान शिकारीच्या उद्देशाने अज्ञात इसमाने लावलेल्या विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृतक अस्वल नर जातीचा असून त्याची वय १० वर्षे आहे. शिकार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सदर जंगल परिसरात जिवंत विद्युत तारा पसरविल्या हाेत्या. या ताराच्या खालीच ही अस्वल अडकून पडली.
घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाेहाेचून संपूर्ण माहिती जाणून घेतली. परिसराची पडताळणी केली. भारतीय वनअधिनियम १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलमान्वये अज्ञात आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अस्वलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शाेधून काढण्यासाठी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदन करून त्याचे नमुने सिल करण्यात आले. सिल केलेले नमुने नागपूरच्या प्रयाेगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सदर अस्वलाची शिकार करणाऱ्या व्यक्तीचे नाव जाे काेणी सांगेल त्याला वनविभागाकडून दहा हजार रुपये राेख पारिताेषिक देण्यात येणार असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पंचनाम्याची कार्यवाही सिराेंचाचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. एम. पाझारे, वनपाल एस. एस. निलम, ए. बी. पाेटे, आर. वाय. तलांडी, वनरक्षक आर. एल. आत्राम, एस. बी. भिमटे व इतर वनकर्मचाऱ्यांनी केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos