चंद्रपुरात विवाहितेची आत्महत्या , पती व कुटुंबीयांना अटक करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
व्यवसाय सुरू करण्यासाठी अभियंता पतीने १० लाखांची मागणी वारंवार करून त्रास देत असल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
  गायत्री चंदन घोडे (३०) असे   गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव आहे. दरम्यान, पती चंदन घोडे व कुटुंबीयांना तात्काळ अटक करा, अशी मागणी गायत्रीच्या  माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे.   चंदन याचा विवाह नेरी येथील गायत्री सोबत झाला. विशेष म्हणजे, चंदनचा हा दुसरा विवाह होता. कारण त्याची पहिली पत्नी चंदनकडून होणाऱ्या मारहाण व पैशाच्या मागणीला कंटाळून सोडून गेली. त्यानंतर त्याने हा विवाह केला. सुरुवातीचे २-३ महिने सुखात गेल्यानंतर चंदन व कुटुंबीयांनी गायत्री व तिच्या माहेरच्यांकडे सातत्याने पैशाची मागणी केली. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तेव्हा दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादाच चंदनने लावला. सातत्याने पतीकडून छळ होत असल्याने गायत्रीच्या मनावर परिणाम झाला. सासरची मंडळी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले व मानसिक रुग्ण आहे, असे दाखवण्यास सुरुवात केली. हा त्रास इतका विकोपाला गेला की काल सकाळी गायत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, रामनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पैशासाठीच बहिणीचा छळ झाला, या छळाला कंटाळल्याने तिने आत्महत्या केली. तेव्हा पती चंदन व कुटुंबीयांना अटक करा, अशी मागणी गायत्रीच्या बहिणीने केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पती व कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-13


Related Photos