दहावी, बारावी उत्तरपत्रिका मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याच्या सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांनाही निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी याची दखल घेऊन दहावी, बारावी उत्तरपत्रिका मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना या कामातून वगळावे, अशी मागणी केली. यानंतर मंगळवारी मुख्य निवडणूक कार्यालयाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अशा शिक्षकांना अशा कामांतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून निकालाचा मार्गही मोकळा झाला आहे. 
मंगळवारी सकाळी १४ नियामकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्त केल्याची बाब समोर आली. याबाबत शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी तातडीने पुन्हा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. मात्र, दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी मुख्य निवडणूक कार्यालय गाठले आणि तेथे पुन्हा एकदा वस्तुस्थिती मांडली. याआधी सोमवारी शिक्षक आमदार कपिल पाटील, भाजप शिक्षण सेलचे अनिल बोरनारे यांनीही याबाबत निवेदन दिले होते. 
निवडणूक आयोगाचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी यांनी मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्त करू नये तसेच अशी नियुक्ती झाली असेल तर ती रद्द करावी, असे आदेश काढले आहेत.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-13


Related Photos