वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिलला मतदान : जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती


-जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू
-नागरिकांना तक्रारीसाठी 'सी व्हिजिल' अँप 
-ही निवडणूक 'दिव्यांगासाठी सुलभ निवडणूक' म्हणून घोषित
-मतदार संघात एकूण १७ लक्ष २४ हजार ५८१ मतदार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  : 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून वर्धा लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची  तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी- व्हिजिल अँप वर तक्रार करता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली .
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी १८ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. २५ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. २६ मार्चला नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन २८ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. २९ मार्चला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांचे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना ११ दिवसांचा कालावधी मिळणार असून ११ एप्रिलला मतदान होणार आहे. भारतीय खाद्य महामंडळाच्या गोडाऊन मध्ये २३ मे ला मतमोजणी होणार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात धामणगाव ,मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा अशा ६ विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. ३१ जानेवारी ला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादिनुसार वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण १७ लक्ष २४ हजार ५८१ मतदार असून यामध्ये ८ लक्ष ८६ हजार १०९ पुरुष तर ८ लक्ष ३८ हजार ४४७ महिला मतदार आहेत. यामध्ये १२८६ सैनिक मतदारांची सुद्धा  नोंद आहे.  
२०१९ हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष  निवडणूक आयोगाने 'अपंगांसाठी सुलभ निवडणुका' असे घोषित केले असून मतदार संघात एकूण ४३९१ दिव्यांग मतदारांची ओळख पटविण्यात आलेली आहे. त्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व्हील चेअर ची सुविधा सुद्धा पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी रॅम्प ची व्यवस्थाही करण्यात येणार  असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 
आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदार वंचित राहता कामा नये   या घोष वाक्यानुसार जास्तीत जास्त मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. यात दिनांक २३ व २४ फेब्रुवारी व ३ व ४ मार्च रोजी दोन विशेष मतदार नोंदणीसाठीचे कॅम्प राबविण्यात आलेले आहेत व त्यामध्ये एकुण नमुना-६-८६३१, नमुना-७-३६९८ व नमुना-८ अ-१०२ प्राप्त झालेले आहेत. त्यांची डाटाएन्ट्री करण्यात आलेली असुन त्यांचा समावेश पुरवणी मतदार यादीमध्ये करण्यात येणार आहे.
संघात एकूण १९९५ मतदान केंद्र असून ग्रामीण भागात १५५९ तर शहरी भागात ४३६ मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रावर १४०० पेक्षा जास्त मतदार आहेत त्यामुळे अशा ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्राची निर्मिती केली असून असे २८ सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.  सर्व मतदान केंद्रावर एकुण ८ आश्वासित पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार  आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, अपंगांसाठी रॅम्पची  सुविधा, विजेची सुविधा, मदतकक्ष, प्रसाधनगृह, फर्नीचर, दिशादर्शक फलक, सावलीसाठी शेड या सर्व सुविधाचा समावेश असणार आहे.  
 नागरीकांना व मतदारांना आचार संहिता भंगाच्या तक्रारी व मतदार यादी  विषयक व मतदान केंद्राविषयी माहितीसाठी जिल्हा संपर्क क्रमांक टोल फ्री.१९५० या क्रमांकावर संपर्क साधून करता येणार आहे. ११ मार्च  रोजी दुपारी १ वाजेपर्यंत एकुण ३४५ नागरीक मतदार यांनी या क्रमांकावर संपर्क साधून आपले शंकांचे समाधान करून माहिती घेतलेले आहे.
 एकुण ४८ शासकीय जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची   स्थापना करुन  नोंडल अधिकारी  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिक मतदारांना निवडणूक विषयी माहिती देण्यात येते.
 या निवडणूकीत इ.व्ही.एम  सोबत व्ही.व्ही.पॅट  या मशिनचा वापर सर्व मतदान केंद्रावर नागरीकांना मतदान नेमके कोणत्या उमेदवारांस केले याची खात्री व्हावी यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीयेत सुलभता व पारदर्शकता आलेली आहे. इ.व्ही.एम  सोबत व्ही.व्ही.पॅट  जनजागृती मोहिम अंतर्गंत जिल्हयातील एकुण 1387 गांवामध्ये मिळून एकुण १३१४ मतदान केंद्रांवर एकुण ६६१५७ मतदारांची जागरुकता करण्यात आलेली आहे. व ४१७६१ मतदारांनी डेमो मत टाकुन आपले मत दिलेल्या उमेदवारांसच जात असल्याची खात्री करुन घेतलेली आहे.
 या लोकसभा निवडणूकीत C-Vigilance नावाचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून त्याव्दारे मतदारांना आचार संहिता भंगाविषयीच्या तक्रारी चे Video  चित्रीकरण करून पाठविता येणे शक्य होणार आहे. उमेदवारांसाठी विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी (मिरवणूक, प्रचार सभा, वाहनांची परवानगी तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी इत्यादी) या निवडणूकीत सुविधा (Suvidha)या प्रणाली व्दारे प्राप्त करून घेता येणार आहेत
   नागरीकांसाठी व मतदारांसाठी विविध शंकांचे व समस्याचे समाधान करून घेण्यासाठी समाधान (Samadhan) नावाचे ॲप तयार करण्यात आलेले आहे. विविध शासकीय वाहने अधिग्रहीत करण्यासाठी सुगम (Sugam) नावाचे ॲप तयार करण्यात आलेले आहे.
 जिल्हयात एकुण 8 हजार  408 (पुरुष-7 हजार 653 व महिला-3 हजार 30 ) शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक असल्याने त्यांची Polling Staff  मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हयात एकुण 153 क्षेत्रिय अधिकारी (Sector/ Zonal Officer)  यांची नियुक्ती प्रत्येकी 10 ते 12 मतदान केंद्रावर सुरळीत मतदान व्हावे व मतदारांना मतदान केंद्रांवर आश्वासित पायाभुत सुविधा पुरविल्या जातात किंवा नाही याकामी देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करणत आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, देवळीचे तहसीलदार मनुज जिदाल, उपजिल्हा निवडणूक अधिकरी, प्रविण महिरे  , जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थितीत होते

   Print


News - Wardha | Posted : 2019-03-11


Related Photos