लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने राबवा – जिल्हाधिकारी


-  आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
- राजकीय पक्षांनी सहकार्य करावे
- होर्डिंग बॅनर तात्काळ काढावे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  भंडारा :
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीची आचार संहिता १०  मार्च पासून सुरु झाली असून ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व निपक्षपाती राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर असून निवडणूकीसंबंधी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नोडल अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते.
 मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी व विविध विभागाचे अधिकारी तथा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपली कार्यालय व परिसरातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील पोस्टर्स, कटआऊट, होर्डिंग, बॅनर, झेंडे तात्काळ काढून टाकावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
 शासकीय वाहनाचा दुरुपयोग थांबवावा. सार्वजनिक निधीच्या खर्चावर कुठलीही जाहिरात करण्यात येवू नये. शासकीय संकेतस्थळावर असणारे राजकीय नेत्यांचे छायाचित्र तात्काळ काढावे. निवडणूक जाहिर झाल्यापासून ७२ तासाच्या आत प्रत्यक्ष कामांची सुरुवात झालेल्या कामांची यादी व प्रत्यक्ष कामांची सुरुवात न झालेल्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विकास कामांचे माहिती फलक झाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहितेबाबत माहिती दिली. भंडारा जिल्हयात 1206 मतदान केंद्र असून 5 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. छायाचित्र मतदान ओळखपत्र असणाऱ्यांनी मतदानासाठी याच ओळखपत्राचा वापर करावा. या व्यतिरिक्त आयोगाने ठरवून दिलेल्या 11 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्राचा मतदानासाठी उपयोग करता येईल. मतदान  करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्होटर्स हेल्प डेक्स स्थापन करण्यात येणार आहे. सगळया परवानग्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सभेसाठी मैदान व सभास्थळ परवानगीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १८ मार्च सोमवार निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. २५ मार्च, सोमवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. २६ मार्च मंगळवारला नामनिर्देशनपत्राची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २८ मार्च गुरुवार आहे. ११ एप्रिलला मतदानाचा दिनांक असून २३ मे रोज गुरुवारला मतमोजणी होईल. २७ मे रोजी निवडणूक प्रक्रिया  पूर्ण करण्याची तारीख आहे.
  राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय पक्ष यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीकडे संपर्क करावा. आचार संहिता भंगाची तक्रार करण्यासाठी आयोगाच्या Cvigil या  अॅप्लीकेशनवर संपर्क करावा. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयात कंट्रोल रुम स्थापन करण्यात आली आहे. निवडणूकीदरम्यान शासकीय विश्रामगृह जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय देण्यात येऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या.                           Print


News - Bhandara | Posted : 2019-03-11


Related Photos