शिक्षण आशय परिषदेत विविध विषयांची सविस्तर मांडणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस         
प्रतिनिधी / गडचिरोली :
सत्यशोधक विचार मंच ,गडचिरोली  द्वारा काल १० मार्च रोजी   जि. प. हायस्कुल ,गडचिरोली च्या सभागृहात   क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मृतीदिनी "शिक्षण हक्क व आशय परिषद " घेण्यात आली. तीन सत्रामध्ये चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात  नांदेड येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण विषयाचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी "भारतीय शिक्षण : ऐतिहासिक दृष्टिकोन "या विषयावर सविस्तर मांडणी केली .
 अनेक जागतिक दर्जाच्या इतिहासकारांच्या मते 'भारतात शिकविल्या गेलेला इतिहास हा केवळ राजकीय इतिहास आहे. सामाजिक संघर्षाची यात नोंद घेतली गेली नाही . म्हणून भारतीय इतिहासाला राष्ट्रवादी इतिहास म्हणतात .
भारतातील शिक्षण व्यवस्था ही वर्ण व्यवस्था ,जाती व्यवस्था यांचा उल्लेख न करणारी आहे .त्यापूर्वी प्राचीन काळाच्या इतिहासात मात्र शोषण नव्हते , जातीयता नव्हती .वर्ण समाज येण्यापूर्वी भारतात स्त्रीसत्ताक समाज होता .शिक्षणाचा संबंध भाषेशी येतो हे विषद करतांना ,संस्कृत ही भाषा कोणत्याही भाषेची जननी नाही. भारतातील कोणत्याही भाषेचा जन्म स्वतंत्र आहे. हे अभ्यासाअंती सिद्ध झालेलं  आहे. दुसऱ्या सत्रात  अमेरिका व इंग्लंड येथे राहून शिक्षण प्रश्नांचा अभ्यास करणारे अभ्यासक  श्रीकांत काळोखे (अ.नगर )  यांनी "भारतीय शिक्षण : आजची आव्हाने " या विषयावर सविस्तर मांडणी  केली .
शिक्षणाचे खाजगीकरण करणे ,तसेच शिक्षणावर आज घडीला फक्त सव्वादोन ते सव्वातीन टक्के खर्च केला जातो, जे की कोठारी आयोगाच्या म्हणण्यानुसार सहा टक्के खर्च करायला पाहीजे. सरकारी शाळा बदनाम करणे ,त्यांचे आर्थिक खच्चिकरण करणे आणि हे परवडणारे नाही म्हणून शाळा बंद करणे अशाप्रकारे शासनाने सरकारी शाळांवर घाव घातलेला आहे . जगातील प्रगत राष्ट्रांचं रहस्य हे आहे की,तेथे समन्यायी शाळा व्यवस्था आहे ;मात्र भारतात "घोका आणि ओका" ओकणारा मेरीट ,अशी व्यवस्था आजही आहे, असे ते म्हणाले.  उद्घाटन सत्रात  तारका जांभुळकर, डॉ. नरेश मडावी, धर्मानंद मेश्राम हे प्रमुख वक्ते होते. चर्चा सत्राच्या वेळात प्रश्नांची उत्तरे मान्यवरांनी दिली.
 तीन सत्रात चाललेल्या या कार्यक्रमात  भिमराज पात्रीकर , डॉ. दिलीप बारसागडे,  रमेश बिजेकर अध्यक्षस्थानी होते.   संचलन बुलबुल वाळके, सुधा चौधरी व नैना बन्सोड ह्यांनी केले . प्रास्ताविक  डॉ.संतोष सुरडकर यांनी केले तर आभार अशोक मांदाडे यांनी मानले .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos