वेदनाशमन शिबिरात दीर्घकालीन दुखण्यावर उपचार : सर्च मध्ये दुखण्याने त्रस्त ४२ लोकांची तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात एका दिवसीय वेदनाशमन शिबीर म्हणजेच ‘पेन क्लिनिक’ घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले.
शरीराच्या एखाद्या भागावर ताण पडल्यास तो काही कालावधीकरिता दुखणे ही सामान्य बाब आहे. औषधोपचाराने काहीच दिवसात यापासून आराम मिळतो. पण वर्षानुवर्ष एकाच प्रकारच्या दुखण्याने काही जण त्रस्त असतात. औषध घेऊनही पाहिजे तसा फायदा होत नाही. त्यामुळे हे दुखणे त्यांचे रोजचे जगणे बाधित करते. परिणामी चालताना, बसताना प्रचंड यातना होतात. दुखण्याने झोप येत नाही. रोजची कामे करता येत नाही. अशा प्रकारच्या दुखण्यावर इलाज करणे आवश्यक ठरते. कंबर, मान, डोके, सांधे, गुडघे येथील दुखण्याचा यात समावेश असतो. सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना अशा प्रकारचे दीर्घकालीन दुखणे असल्याचे लक्षात घेत ९ मार्च रोजी ‘पेन क्लिनिक’ घेण्यात आले. यात एकूण ४२ रुग्णांची तपासणी करून त्यातील आठ रुग्णांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले. मुंबईतील पेन स्पेशालिस्ट डॉ. जितेंद्र जैन, डॉ. शाहनवाज आणि सर्च दवाखान्यात भूलतज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. शिल्पा मलिक यांनी रुग्णांवर उपचार केले. अनेकांना दुर्घकालीन दुखण्याचा त्रास असतो. अशा रुग्णांनी सर्च मध्ये येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. आगामी काळात होणाऱ्या वेदनाशमन शिबिराची तारीख त्यांना सांगितली जाईल.

 
‘पेन क्लिनिक’ उपचारपद्धती    

दीर्घकालीन वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती उपयोगात आणली जाते. या उपचार पद्धतीत सर्वप्रथम जास्त दुखणे असलेल्या भागाची तपासणी करून त्या भागावर किंवा दुःखाची सुरुवात असलेल्या जागेवर वेदनाशमन इंजेक्शन दिल्या जाते. तपासणी केल्यावर औषधोपचाराने दुखणे थाबणार नाही हे तपासूनच इंजेक्शन दिले जाते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos