असा आहे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली-चिमूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा  मतदारसंघां पैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यामधील १, गडचिरोली जिल्ह्यामधील ३ व चंद्रपूर जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला असून तो अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. या मतदारसंघात ७ लाख ५३ हजार ९२७ पुरुष आणि ७ लाख १५ हजार ८४० महिला मतदार आहेत. 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे नामदेवराव उसेंडी होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे विजयी झाले होते. लोकसभा क्षेत्रातील   सहा विधानसभापैकी गडचिरोली भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी, तर आरमोरीत भाजपाचे कृष्णा गजबे, अहेरीत राजे अम्ब्रीशराव आत्राम, चिमूरमध्ये भाजपाचे बंटी भांगडिया , ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि आमगावमध्येही भाजपचाच आमदार आहे.  
देशातील २५ मागास जिल्ह्यांच्या यादीत गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून भारतात ओळखला जातो. या जिल्ह्यात आदिवासी राखीव आमदार आणि खासदार आहेत. या जिल्ह्याला एकीकडे छत्तीसगड, तर दुसरीकडे तेलंगणा राज्याची सीमा लागते. या जिल्ह्यातील आदिवासी तेलुगू, गोंडी, मडिया यासोबतच मराठी भाषेचा जास्त वापर करतात.  
एप्रिल २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपात उमेदवारांची चढाओढ नाही. यामुळे विद्यमान खासदार अशोक नेते हेच लोकसभेचे उमेदवार राहू शकतात. मात्र काँग्रेस पक्षामध्ये इच्छुक असलेल्यांनी दिल्लीत ठाण मांडले असून अद्याप उमेदवारिची माळ कुणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस कडून माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते आणि नामदेव किरसान हे उमेदवारी मिळविण्यासाठी जातात आहेत. या सर्व उमेदवारांनी मागील अनेक दिवसांपासून जनसंपर्क सुद्धा वाढविला होता.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos