नवेगाव (रै.) जवळ चारचाकी वाहनाची झाडाला धडक, ११ जण जखमी


- ४ जण गंभीर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
निलेश्वर कोठारे / अमिर्झा (गडचिरोली):
चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथून चामोर्शीकडे जात असलेल्या मारूती ओमणी या वाहनाचा चाक निखळल्याने वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात ११  जण जखमी झाले आहेत. यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना आज १० मार्च रोजी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.
झामदेव चलाख रा. सिंतळा, समिर अरूण नैताम रा. ठाणेगाव, मिराबाई वासेकर रा. बोदली आणि निराशा संदिप सातपुते रा. वालसरा ता. चामोर्शी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर कविता अरूण नैताम, यामिना अरूण नैताम, अरूण नैताम तिघेही  रा. ठाणेगाव ता. आरमोरी, संजय धोडरे रा. मेंढा ता. गडचिरोली, प्रभाकर वासेकर, अनिल मोगरकर रा. बोदली ता. गडचिरोली तसेच वाहन चालक संदीप सातपुते रा. वालसरा व त्यांच्या  दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. 
प्राप्त माहितीनुसार नवेगाव रै. येथील नरेंद्र कुकडे यांच्या मुलीचा  काल ९ मार्च रोजी विवाह सोहळा होता. त्यानिमित्त मुलीला भेटवस्तू घेण्यासाठी संदिप सातपुते यांच्या एमएच ३१ सिएम ८१२५ या क्रमांकाच्या वाहनाने चामोर्शी येथे जात असताना गावापासून काही अंतरावरच वाहनाचे चाक निखळल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकले. 
अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्तांना मदत केली. रूग्णवाहिकेची वाट न बघता तातडीने खासगी वाहनाने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहीपर्यंत पोलिस तपास सुरू होता. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-10


Related Photos