महत्वाच्या बातम्या

 पेंच-नागझिरा काॅरिडाॅरमधील २ लाख झाडांच्या रक्षणासाठी चिपकाे आंदाेलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पादरम्यान वाघांचा भ्रमणमार्ग असलेल्या गुगलडाेह येथे प्रस्तावित मॅंगनीज खाणीसाठी मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये १०० हेक्टर परिसरातील जवळपास २ लाख झाडे कापली जाण्याचा धाेका व्यक्त करीत पर्यावरण कार्यकर्त्यांनी रविवारी गुगलडाेहच्या जंगलात चिपकाे आंदाेलन केले.

पर्यावरण कार्यकर्त्या व स्वच्छ असाेसिएशनच्या संयाेजक अनसूया काळे छाबरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार रामटेकजवळ गुगलडाेहच्या १०५ हेक्टर परिसरात मॅंगनीज खाण प्रस्तावित आहे. यातील १०० हेक्टरचा परिसरात वनविभागाच्या अखत्यारित येते. या परिसरात वाघ व इतर वनचरांचा अधिवास नसल्याचे नमूद करून वनविभाग आणि राज्य शासनाकडूनही प्रकल्पासाठी मंजूरी मिळाली आहे. आता केवळ केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी बाकी आहे. या मंजुरीचा पर्यावरण कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे.

अनसूया काळे यांनी सांगितले, हा परिसरात पेंच व नागझिरा व्याघ्र प्रकल्पादरम्यान प्रवास करणाऱ्या वाघांचा भ्रमणमार्ग आहे. १०० हेक्टरमध्ये घनदाट जंगल पसरले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या प्रस्तावित खाण क्षेत्रात वाघ, बिबट्या आणि इतर शेड्यूल-१ प्रजातींसह अनेक पक्षी, शाकाहारी प्राणी आणि कीटकांच्या अधिवासाचा प्रत्यक्ष पुरावा आहे. हा परिसर महाराष्ट्रातील टायगर कॉरिडॉरमध्ये येताे. हे जंगल हे औषधी आणि आयुर्वेदिक निसर्गाच्या अनेक वनौषधींचे घर आहे आणि त्यातील अनेक प्रजाती लुप्तप्राय हाेण्याची भीती आहे. असे असताना या प्रकल्पाला मंजुरी देणे निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली. प्रकल्पात ३५ हजार झाडे कापली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र घनदाट जंगलाच्या या परिसरातील जवळपास २ लाख झाडांवर कुर्हाड चालणार असल्याचे त्या म्हणाल्या. अशाप्रकारे वाघांचे भ्रमणमार्ग नष्ट करून मानव-प्राणी संघर्ष वाढविण्याला प्राेत्साहन दिले जात असल्याचा आराेप त्यांनी केला.

अलिकडच्या काळात वाघ आणि इतर प्राण्यांचे स्पष्ट अस्तित्व असतानाही वनविभागाने घाईघाईने वन्यजीवांना परवानगी दिली आहे. या भागातील एका खाणीमुळे संपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरचे नुकसान होईल. प्रस्तावित योजना स्पष्टपणे अपुरी आणि चुकीची आहे. खाणकाम करणाऱ्या कंपनीशिवाय या खाणींचा कोणताही सामाजिक-आर्थिक कोणालाच फायदा नाही, उलट नुकसानच आहे. घाईगडबडीत मंजूरी देण्यामागे काही राजकीय पाठबळ असल्याचे दिसते, असा आराेप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर आणि जंगले, झाडे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी चिपकाे आंदाेलन करण्यात आले. यामध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरण कार्यकर्त्यांचा माेठ्या प्रमाणात सहभाग हाेता.





  Print






News - Nagpur




Related Photos