दुचाकीच्या धडकेत चितळ ठार, तिघेजण गंभीर जखमी


- वैरागडजवळील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची
: आरमोरी - वैरागड मार्गावर वैरागड जवळील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर अचानक आलेल्या चितळाला दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात चितळ जागीच ठार झाले असून दुचाकीवरील एका लहान मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सदर घटना आज १० मार्च रोजी दुपारी २.४५  वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची नावे कळू शकली नाहीत. एमएच ३३ एच ०७७५ क्रमांकाच्या दुचाकीने एका लहान मुलीसह दोघे जण  वैरागड येथून आरमोरीकडे जात होते. दरम्यान पाण्याच्या टाकीजवळ अचानक चितळ आडवे आल्याने दुचाकीची धडक बसली. सध्या उन्हाळ्यास प्रारंभ होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. हे प्राणी मार्गावर आल्याने वाहनांचे बळी पडतात किंवा गावठी कुत्रे किंवा शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात. यामुळे वनविभागाने लवकरात लवकर जंगलांमध्ये पाणवठे तयार करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-10


Related Photos