ऑटोचालकाची इमानदारी , रस्त्यावर सापडलेला मोबाईल केला परत


- अनेकांकडून कौतुक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा :
  प्रामाणिकपणा...शब्द केवळ पुस्तकातच जिवंत असल्याचे अनेकांच्या बोलण्यातून जाणवते. आजच्या स्वार्थी जगात हा शब्द नावालाच शिल्लक असल्याचे अनेकवेळा समोर आले. पण, वर्ध्यात  एका ऑटोचालकाने रस्त्यावर सापडलेला मोबाईल त्याच्या मालकाचा शोध घेऊन परत केला. ही घटना प्रामाणिकपणा आणि माणसाच्या अंगी असलेली माणुसकी अद्याप जिवंत असल्याचा पुराव देऊन गेली. 
येथील ऑटोचालक नामदेव इखार यांना शनिवार दि. ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास एका औषधीच्या दुकानाखाली महागडा मोबाईल सापडला. त्याने तो मोबाईल कोणाचा असे म्हणत इतरत्र शोध घेतला. मात्र, कोणीच मिळून आले नाही. हा महागडा मोबाईल सापडल्यावर तो जवळ ठेवण्याची लालसा कदाचित त्याच्या मनात आली असती तर तो ठेवू शकला असता पण, त्याने तस केले नाही. काही काळ प्रतीक्षा करून हा मोबाईल घेऊन त्यांनी वर्धा शहर पोलिस ठाणे गाठले.
पोलीसांनी त्यांच्याकडे असलेल्या यांत्रिक सुविधेच्या मदतीने त्या मोबाईलच्या मालकाचा शोध घेतला. हा मोबाईल आशिष कुनघटकर यांच्या मालकीचा असल्यसाचे समोर आले. ऑटोचालकाच्या प्रामाणिकपणाला पोलिसांनीही साथ दिली. मोबाईल मालकाचा शोध घेण्याकरिता त्यांना दोन तासाचा कालावधी लागला.अखेर मोबाईल मालकाला पोलिस ठाण्यात पाचारण करण्यात आले. मोबाईल मालक पोलिस ठाण्यात आल्यानंतर ऑटोचालक नामदेव इखार यांच्या हस्ते त्यांना मोबाईल परत करण्यात आला.यावेळी पोलिस आणि मोबाईल मालकाकडून इखार यांचे कौतुक करण्यात आले.

   Print


News - Wardha | Posted : 2019-03-09


Related Photos