महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल


- निराधार व वृद्ध कलावंत मानधन योजनेत असलेली उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असुन निराधार व वृद्ध कलावंत मानधन योजनेत असलेली उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. आता सदर प्रमाणपत्र दरवर्षी सादर करण्याची गरज नसुन पाच वर्षातुन एकदा सदर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तसा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.

राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध कलावंत योजना व इतर मानधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून दरवर्षी हयात प्रमाणपत्र सादर करण्यात येत असते. आता बिगर बीपीएल राशन कार्ड धारक लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. निराधार योजनेंतर्गत मानधन मिळणारे लाभार्थी हे ६५ ते ८५ वयाचे वयोवृद्ध असून त्यांच्या उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसतात. त्यातच उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याकरिता अतिरिक्त खर्च व वेळ लागत असून त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना नाहक आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता वृद्ध कलावंत मानधन योजनेंतर्गत हयात प्रमाणपत्रासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करून लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली होती. या मागणीचा पाठपूरावा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने सुरु होता.

अखेर सदर मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून निराधार व वृद्ध कलावंत मानधन योजनेत असलेली उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट शिथील केली आहे. आता सदर योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पनाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. तर पाच वर्षातून एकदा त्यांना सदर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे आता या योजनेच्या लाभार्थ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. मागणीची दखल घेत पात्र लाभार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्या बदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos