महत्वाच्या बातम्या

 डोक्यावरचे छत गेले, संसारोपयोगी साहित्य नेले : अतिक्रमणधारकांचा मुलाबाळांसह पालिकेत ठिय्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील गोकुलनगरातील देवापूर रिठ सर्वे क्र. ७८ व ८८ येथील तलावातील झोपडपट्टी अतिक्रमणावर २१ जून रोजी पालिका प्रशासनाने बुलडोजर चालविला. या मोहिमेला विरोध करणाऱ्या महिला-पुरुषांसह अबालवृद्धांवर पोलिसांनी लाठी चालवली. आता डोक्यावरचे छत गेले, संसारोपयोगी साहित्यही उचलून नेले, त्यामुळे जायचे कोठे, असा प्रश्न अतिक्रमणधारकांपुढे निर्माण झाला आहे. संतप्त अतिक्रमणधारकांनी नगरपालिका आवारात ठिय्या दिला आहे. रात्री उशिरापर्यंत प्रशासनातर्फे या लोकांशी संवाद साधण्यासाठी कोणी आले नाही.

गोकुलनगरातील देवापूर रिठ येथील एकतानगरमधील झोपडपट्टी अतिक्रमण यापूर्वीच हटविण्यात आले होते, परंतु पुन्हा तिथे शंभरावर कुटुंबे झोपड्या बांधून राहू लागले. पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आव्हान दिले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. 

२१ जून रोजी पालिका प्रशासनाने जेसीबी, पोकलॅन, ट्रॅक्टर, अग्निशमन दलाचा बंब अशा साधन सामुग्रीसह तब्बल कडेकोट पोलिस बंदोबस्त घेऊन देवापूर रिठ गाठले. अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. मात्र अतिक्रमणधारक ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. संसारोपयोगी साहित्यासह अतिक्रमणधारकांना ताब्यात घेतले. हे साहित्य पोलिस मुख्यालयात नेले तर अतिक्रमणधारकांना काही वेळ ताब्यात ठेऊन सायंकाळी सोडून दिले. 

अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर : अनेक झोपड्या उद्ध्वस्त

दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. झोपडपट्ट्या जमीनदोस्त करून जागोजागी खड्डे खोदण्यात आले. रात्री आठ वाजेपासून अतिक्रमणधारक नगरपालिका कार्यालयात चिल्यापिल्यांसह ठिय्या देऊन बसले आहेत. प्रशासन पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच राहील, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.

शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. काही ठिकाणी अतिक्रमण नियमित करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या आहेत, तर काही ठिकाणी तुकडे पाडून प्लॉटिंग केली आहे. भूमाफियांना पायघड्या टाकणाऱ्या प्रशासनाने गोरगरीब, वंचित लोकांना बेघर करण्याचे काम केले आहे. आम्ही या कुटुंबांच्या लढ्यात सहभागी आहोत. - बाशीद शेख, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गडचिरोली.

मारहाणीतील एकाची प्रकृती गंभीर -

अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करताना पोलिस व अतिक्रमणधारकांत झटापट झाली. यावेळी पोलिसांनी काहींना लाठ्यांनी मारहाण केली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दामोदर यादव नंदेश्वर (६४), मुनिफा मेहबूब मलिक ( ४०), सीता रामदास सोनूले (६५), जहिर हनिफ अन्सारी (४५), मालाताई भसुराजभजगवळी (५०) यांचा समावेश आहे. यापैकी दामोदर नंदेश्वर हे गंभीर जखमी आहेत. मारहाण झालेल्यांपैकी कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे बाशीद शेख म्हणाले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos