नागपुरात बोगस पदवीचे रॅकेट ; सहा जण अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  पैसे घेऊन बनावट बी-टेक, एमबीए, बीबीए या पदवीसह दहावी आणि बारावीच्या दिल्ली बोर्डाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेट उघडकीस आणत ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनीअर या संस्थेच्या ॲडमिनसह पाच महिला पदाधिकारी अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. ११००पेक्षा अधिक प्रमाणपत्र त्यांच्याकडून जप्त करण्यात आली असून मागील सात वर्षांपासून बनावट पदव्यांचे रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
महाराष्ट्राच्या उपराजधानीतून चालवल्या जाणाऱ्या या संस्थेची माहिती ठाणे गुन्हे शाखेला समजल्यानंतर संस्थेच्या नागपूर येथील कोराडी रोडवर असलेल्या मुख्य कार्यालय आणि दोन उपकार्यालयावर मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले. यावेळी संस्थेचे ७२२ मार्कशीट, २४१ प्रमाणपत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे १५ गुणपत्र आणि चार प्रमाणपत्रे, छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी कानपूरचे २५ गुणपत्रे, ३७ प्रमाणपत्रे, डॉ. सी. व्ही. रमन युनिव्हर्सिटी बिलासपूर छत्तीसगडचे १ गुणपत्रक, ७४ प्रमाणपत्र असे एकूण ७६३ गुणपत्रके आणि ३५६ प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. एकूण शैक्षणिक प्रमाणपत्रांची संख्या १ हजार ११९ असून संस्थेचा अॅडमिन मोहमद अझहर मोहमद इस्माईल अन्सारी (२७) रा. नागपूर याच्यासह ५ महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सर्वात मोठे बनावट पदवीचे रॅकेट उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त दीपक देवराज यांनी दिली.   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-07


Related Photos