निर्माण शिबिरात ‘तारुण्यभान ते समाजभान’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या “निर्माण” या उपक्रमाच्या नवव्या सत्रातील पहिले शिबीर नुकतेच शोधग्राम, गडचिरोली येथे पार पडले.
‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात स्वतःच्या लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार होणे, ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्माण करणे, अर्थपूर्ण आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिरांची होती.
महाराष्ट्रासह राज्याबाहेरील वैद्यकीय, इंजिनिअरिंग, विज्ञान, पत्रकारिता, कला, समाजकार्य कॉमर्स, मास मीडिया, शेतकी, व्यवस्थापन अशा शाखेत शिकत असलेल्या ६५ युवांनी या शिबिरात सहभाग घेतला. माझ्या सामजिक काम करण्यामागच्या प्रेरणा काय, माझी मुल्ये काय, ती मी कशी शोधू, माझी मासिक आर्थिक गरज किती, ती मी कशी काढू, मी काम करण्यासाठी क्षेत्र कोणत्या निकषांवर निवडू, असे प्रश्न समजून घेतले आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या सत्रात युवक युवतींनी केला. ‘समाजातील वेगवेगळ्या घटकांचे शेती आणि शेतकऱ्याविषयीचे मत आणि शेतकऱ्याची परिस्थिती’ हा विषय शिबिरार्थ्यानी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत ‘तारुण्यभान ते समाजभान असा टप्पा समजून घेतला. 
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गडचिरोलीतील गावांना भेटी देत ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. गटा-गटांनी गावातील विविध प्रश्नांविषयीची निरीक्षणे आणि कृती कार्यक्रम सादर केले.शिबिराच्या अंतिम टप्यात पुढील सहा महिन्यात मी काय कृती करणार याचा एक ढोबळ आराखडा सर्वांनी बनवला.
निर्माण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया:

अहंकार कमी झाला :  शुभम राऊत 

‘निर्माण’मध्ये मला सामाजिक प्रश्न प्रभावीपणे कसे सोडवता येतील याची स्पष्टता आली. मी सामाजिक क्षेत्रात काम करतो. त्यामुळे आपण खूपच स्पेशल असल्याचा अहंकार माझ्या मनात बळावत चालला आहे ही बाब मला शिबिरात लक्षात आली. आपणच नाही तर समाजासाठी काम करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे माझ्या समाजकार्याला याचा अहंकार गळून पडला. 
 

सगळं मीच हा संभ्रम दूर झाला - श्वेता आगव

माझं अस्तित्व किती क्षुल्लक आहे हे कळल्यावर माझ्यातला ‘मी’ कुठेतरी मागे पडला आहे आणि लोकांचे प्रश्न, अडचणी, गरजा पुढे येऊ लागल्या आहेत. सगळं मीच करते ह्या संभ्रमातून मी जास्त परिणामकारक काय करू शकते, गरज कशाची आहे हा विचार मी आता करायला लागली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-06


Related Photos