त्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन , ९५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वन विभाग व स्वंयसेवी संस्था यांच्यात आज ४ त्रिपक्षीय करार झाले. याद्वारे राज्यात ९५ हेक्टर राखीव तसेच अवनत वनक्षेत्रावर साधारणत: ६० हजारांहून अधिक वृक्षलागवड करण्याचे निश्चित झाले. यामध्ये स्वयंसेवी संस्थांकडून अंदाजे ३ कोटी ८४ लाख रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
यावेळी वनमंत्री ना.  मुनगंटीवार यांच्यासमवेत वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, त्रिपक्षीय करारात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या करारामध्ये  मौजे निघोटवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील १० हेक्टर राखीव वनक्षेत्रावर मोरडे फूडस प्रा.‍लि. मंचर, पुणे या औद्योगिक तसेच मे. शाश्वत चॅरिटेबल ट्रस्ट मंचर या अशासकीय संस्थेने करार केला. विशेष बाब म्हणून त्यांच्या १० हेक्टर क्षेत्रावरील वृक्षलागवडीस अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली. ही संस्था प्रती हेक्टर ८२५ रोपे याप्रमाणे ८ हजार २५० रोपे लावणार आहे. यासाठी अपेक्षित खर्च साधारणत: ४६ लाख रुपयांचा आहे.
दुसरा त्रिपक्षीय करार मौजे काळज, ता. फलटण, जिल्हा सातारा येथील २५ हेक्टर अवनत वन क्षेत्रावरील वृक्ष लागवडीसाठी करण्यात आला. मे. कमिन्स इंडिया फाऊंडेशन, बालेवाडी, पुणे ही औद्योगिक संस्था  तर संकल्प सामाजिक व शैक्षणिक ही अशासकीय संस्था यात सहभागी झाली आहे. वन विभागासोबत आज झालेल्या करारात मौजे काळज येथे २५ हेक्टरवर प्रती हेक्टर ६२५ याप्रमाणे १५ हजार ६२५ रोपे लावण्यात येतील. याचा अंदाजे खर्च १ कोटी १२ लाख ५६ हजार ८८४ रुपये इतका आहे. मे. कमिन्स ही संस्था पुण्यात ही २० हेक्टर क्षेत्रावर वारजे येथे ६२५ रोपे प्रती हेक्टर याप्रमाणे वृक्ष लागवड करील. पहिल्या टप्प्यात २ हेक्टरवर १२५० रोपे लावण्यात येणार आहेत. यासाठी  साधारणत: आठ लाख रुपये खर्च येईल.
चौथा करार हा मर्सिडीज बेंझ इंडिया प्रा. लि. चाकण यांच्यासमवेत करण्यात आला असून ते एकूण ४० हेक्टर राखीव वनक्षेत्रावर त्रिपक्षीय करारातून वृक्ष लागवड करतील. येथे प्रती हेक्टर ८२५ रोपे अशी एकूण ३३ हजार रोपे लावली जातील ज्याचा खर्च २ कोटी १७ लाख रुपयांच्या आसपास राहील.

वृक्षलागवड करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार करावेत - सुधीर मुनगंटीवार

औद्योगिक संस्थांकडे, कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता असते. ज्या कंपन्या त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्ष लागवडीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जावे तसेच ज्या कंपन्या केवळ आपला सामाजिक दायित्व निधी देऊ इच्छितात त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्ष लागवडीची माहिती देऊन त्यासाठी त्यांचे वित्तीय सहाय्य घेतले जावे, अशा सूचना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. यासाठी वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागा व इतर संबंधित माहिती (ट्रीगार्ड, पाण्याची व्यवस्था, वृक्षांचे जतन आणि संवर्धन) ज्यात ते निधीच्या माध्यमातून योगदान देऊ शकतात त्यांची यादी केली जावी व ती त्यांना पाठवली जावी, असेही ते म्हणाले.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-06


Related Photos