उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ लिंकद्वारे करणार नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  नागपूर मेट्रो  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उद्या गुरुवार ७ मार्चला दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ लिंकद्वारे  करणार आहेत.
महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मेट्रोला आरडीएसओचे प्रमाणपत्र यापूर्वीच मिळाले आहे. आता रेल्वे मंडळ आणि सुरक्षा आयुक्तांच्या हिरवी झेंडीमुळे प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.  पहिल्या दिवशी मेट्रो बर्डी ते खापरी दरम्यान धावणार असून ती पाच स्थानकांवर थांबेल, असा दावा दीक्षित यांनी केला. उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपराजधानीहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधी सहभागी होतील. शहरातील कार्यक्रम एअरपोर्ट दक्षिण मेट्रो स्थानकावर होईल. नागपूरहून मुख्यमंत्र्यांसह इतरही लोकप्रतिनिधी मेट्रोने प्रवास करतील.
सीआरएमएसने तीन तारखेला पाहणी केल्यावर केवळ दोन दिवसांमध्ये त्यांच्यासह रेल्वे बोर्डाकडून प्रवासी वाहतुकीला मंजुरी दिली. इतक्या कमी काळात प्रमाणपत्र देण्याची ही देशातील पहिलीच वेळ असल्याचे दीक्षित म्हणाले. दरम्यान, मेट्रोच्या एलिव्हेटेड मार्गावरील तसेच बर्डीवरील स्थानकाची अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक कशी सुरू राहणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, मेट्रो प्रशासनाने मेट्रो धावणारच, असा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे.     Print


News - Nagpur | Posted : 2019-03-06


Related Photos