चेनलिंक फेन्सींगसाठी लाभार्थ्यांकडून घेण्यात येणारी १० टक्के रक्कम आमदार निधीतून द्यावी


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश 
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत वनालगतच्या गावांमध्ये वन्यजीवांकडून शेताचे नुकसान होऊ नये यासाठी चेनलिंक फेन्सींगची योजना राबविली जाते. यामध्ये लागणाऱ्या एकूण रकमेच्या ९० टक्के रक्कम शासकीय अनुदान म्हणून तर १० टक्के रक्कम सामुहिक लाभाथ्र्याचा हिस्सा म्हणून आकारली जाते. ही १० टक्क्यांची रक्कम लाभाथ्र्यांकडून न घेता ती आमदार निधीतून देता येईल अशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव वन विभागाने नियोजन विभागाकडे सादर करावा अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
 मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 व्याघ्र प्रकलपांच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून ५ कि.मी च्या संवेदनशील असलेल्या गावात वन्यप्राण्यांकडून शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारण्याची योजना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत राबविली जाते. त्यात वरील बदल करणारा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवल्यानंतर नियोजन विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन तशी दुरुस्ती आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांमध्ये करावी व सुधारित आदेश निर्गमित करावेत असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
 जन, जल, जंगल आणि जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढवणे, गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार संधीची उपलब्धता करून याद्वारे मानव व वन्यजीव संघर्ष कमी करणे यासाठी वन विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी राज्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. याअंतर्गत वैयक्तिक तसेच सामुहिक लाभाचे अनेक उपक्रम राबविले जातात. योजनेतील सौर कुंपणाचे वाटप वेगाने केले जावे तसेच मानव- वन्यजीव संघर्षाचे  जे क्षेत्र अतिसंवदेनशील असेल त्या भागात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत अधिक निधी वितरित करण्यात यावा असे आदेशही त्यांनी दिले.  
 वन्यप्राणी गावात आल्यानंतर शेतकऱ्यांना , गावकऱ्यांना त्याचा अलर्ट मिळू शकेल अशी व्यवस्था निर्माण करता येते का, याची माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-05


Related Photos