महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये : कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही व अजूनही आठवडाभर मान्सूनचा पाऊस येणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सद्यस्थितीत फक्त पेरणीचे नियोजन करून ठेवावे व हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी, सल्ला कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
कपाशीची पेरणी जिल्ह्यात काही भागात झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी पिकाची उगवण झाली असल्यास त्याला संरक्षित पाणी देऊन कपाशीचे रोपे वाचवावीत. कोरडवाहू परिस्थितीमध्ये मात्र किमान ७० ते ८० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.


जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन व तूर पिकांची पेरणी केल्या जाते. पेरणी साधारणतः दोन ते तीन इंच खोल केल्या जाते. बियाणे उगवल्यानंतर बिजांकुर दोन ते तीन इंचापासून जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. यालाच आपण उगवण झाली, असे म्हणतो व पुढे वाढ सुरू होते. जेव्हा बियाण्यांची उगवण व्हायला सुरुवात होते त्याच वेळेस बियाण्यांपासून दोन ते तीन इंचाखाली मुळांची सुद्धा जोमाने वाढीची सुरुवात होते.


याकरिता जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते व हा ओलावा पेरणीच्या वेळी टीचभर म्हणजेच सहा ते नऊ इंच असायला पाहिजे. हा एवढा ओलावा जमिनीवर ७० ते ८० मिमी पाऊस झाल्याशिवाय येत नाही म्हणूनच नेहमी तज्ञ १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला देतात.


मागील वर्षी आपल्याकडे सरासरीपेक्षा जवळपास ५५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. यावर्षी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. विदर्भात मोसमी पावसाची सुरुवात सर्वसाधारणपणे ११ ते १७ जूनच्या दरम्यान होते. परंतु नियमित पावसाळा दोन ते तीन आठवडे उशिरा सुरु झाल्यास शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.


त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत फक्त पेरणीचे नियोजन करून ठेवावे. सर्व बियाणे, खते, बिजप्रक्रीयेसाठी लागणारी किटकनाशके, बुरशीनाशके व जीवाणु संवर्धकेसुद्धा खरेदी करून ठेवावे. यावर्षी पेरणीसाठी एकदम कमी कालावधी मिळेल असा सुद्धा अंदाज आहे. पावसाला उशिरा सुरुवात होत असल्याने बिजप्रक्रीया केल्याशिवाय पेरणीसुद्धा करू नये, कारण किडींपासून, रोगांपासून आपल्याला पिक वाचवणे आवश्यक आहे, असे कृषि विज्ञान केंद्राने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos