बालाकोट हल्ल्यात ‘जैश-ए-महंमद’चा म्होरक्या मसूद अझर ठार?


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  : १३ डिसेंबर २००१ रोजीच्या संसदेवरील हल्ला  तसेच   पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जैश-ए-महंमद’चा म्होरक्या मसूद अझर ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बालाकोटवरील हल्ल्यामध्येच तो जखमी झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र, ‘जैश-ए-महंमद’ने पत्रक काढून मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मसूदवर पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याशिवाय अन्य कोणतीही माहिती मिळत नसल्याचे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले आहे. 
पुलवामा हल्ल्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजी हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटवर हल्ला करून ‘जैश-ए-महंमद’चा तळ उद्ध्वस्त केला. या हल्ल्यामध्ये २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यामध्ये मसूद अझरही गंभीर जखमी झाला आणि उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. तर, मूत्रपिंडाच्या विकारांनी आजारी असल्यामुळे मसूद घराबाहेर पडू शकत नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीच सांगितले होते. मसूद अझर बालाकोटच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील काही माध्यमांनी दिले होते. त्याच्या मृत्यूच्या चर्चेनंतरही पाकिस्तानकडून त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय गुप्तचर संस्थांकडूनही अझर मसूदच्या मृत्यूविषयीची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 
बालाकोट मधील हल्ल्यामध्ये झालेले नुकसान किंवा दहशतवाद्यांच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानने नकारघंटा कायम ठेवली आहे. तर, मसूद अझरचा भाऊ मौलाना उमरचा एक ऑडिओ संदेश शनिवारी समोर आला आहे. यामध्ये बालाकोटमधील हल्ला झाल्याची कबुली त्याने देतानाच, एका शाळेलाच लक्ष्य केल्याचा कांगावा केला. यामध्ये या अड्ड्याला लक्ष्य केल्याची कबुली आहे.   Print


News - World | Posted : 2019-03-04


Related Photos