गडचिरोली जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी, बांधकामांना गती येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्ह्यातील  कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिकांची प्रतीक्षा संपली असून  अखेर ३३ रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बांधकामांना गती येणार आहे.  वैनगंगा, खोब्रागडी, सती, कठाणी, पोहार, प्राणहिता, गोदावरी या नद्यांवरील घाटांचा समावेश आहे. ७०० ते ६ हजार ब्रॉसपर्यंतचे रेती घाट आहेत.
 मागील वर्षीपर्यंत रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आले होते. यावर्षीपासून ही परवानगी देण्याचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे सोपविण्यात आले. राज्यस्तरावर दोन समित्या आहेत. त्यामुळे यावर्षी रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यास उशीर झाला. जानेवारीत रेती घाट सुरु होणे अपेक्षित होते. मात्र मार्च महिना सुरु होऊनही रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात निघणे ही लिलावाची पहिली पायरी आहे. त्यामुळे लिलावाच्या जाहिरातीची नागरिक आ वासून वाट बघत होते. अखेर महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी दिली आहे 
१९ मार्च रोजी ई-लिलाव केला जाणार आहे. लिलाव झाल्यानंतर इतर प्रशासकीय बाबी करण्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल. पैसे भरणे व रेती घाट मापून देणे, यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रेती घाट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-03


Related Photos