महत्वाच्या बातम्या

 भरघोस उत्पादनासाठी संतुलित खताचा वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगामास सुरुवात होत असून शेतकरी बांधवाची बियाणे, रासायनिक खते खरेदीची लगबग चालु आहे. अशावेळी पिक निवड, वाण निवड झाल्यावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व जमिन आरोग्य पत्रिकानुसार रासायनिक खताची मात्रा देणे तेवढेच महत्वाचे आहे. तसेच दिलेले रासायनिक खत 100 टक्के पिकाला मिळत नसून फक्त 30 ते 40 टक्के नत्र व 15 ते 20 टक्के स्फुरद पिकाला उपलब्ध होतो. जवळपास 60 ते 70 टक्के नत्र व 80 ते 85 टक्के स्फुरद हवेतून, पाण्यातून वाहून जाते तर काही भाग जमिनीत स्थिर होतो व तो पिकास उपलब्ध होत नाही. रासायनिक खते पिकास जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होण्याकरीता जमिनीत सेंद्रिय पदार्थ तसेच जिवाणूचे प्रमाण मोठ्याप्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे.


जमिनीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण व नत्र म्हणजेच कर्ब नत्र गुणोत्तरावर रासायनिक खताच्या शिफारशीनुसार खतमात्रा देणे अवलंबून असते.
सेंद्रिय कर्ब 0 ते 0.20 टक्के, नत्र 140 किलो/हे. पेक्षा कमी, स्फुरद 15 किलो/हे. पेक्षा कमी, पोटॅश 20 किलो/हे. पेक्षा कमी जमिनीमध्ये उपलब्ध असल्यास विद्यापीठाने पिकासाठी शिफारस केलेल्या मात्रापेक्षा 50 टक्के रासायनिक खत मात्रा वाढवून द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.21 ते 0.40 टक्के, नत्र 14 ते 280 किलो/ हे. कमी,  स्फुरद 15 ते 30 किलो/ हे., पालाश 121 ते 180 किलो/हे. जमिनीमध्ये उपलब्ध असल्यास 25 टक्के खतमात्रा वाढवून द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.41 ते 0.60 टक्के, नत्र 281 ते 420 किलो/हे., स्फुरद 31 ते 50 किलो/हे., पालाश 181 ते 240 किलो/हे. जमीन उपलब्ध असल्यास शिफारशीनुसार खत मात्रा द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.61 ते 0.80 टक्के, नत्र 421 ते 560 किलो/हे., स्फुरद 51 ते 65 किलो/हे., पालाश 241 ते 300 किलो/हे. जमीन उपलब्ध असल्यास शिफारशीच्या 10 टक्के कमी रासायनिक खत द्यावे. सेंद्रिय कर्ब 0.81 ते 1.00 टक्के, नत्र 561 ते 700 किलो/हे., स्फुरद 61 ते 80 किलो/हे., पालाश 301 ते 360 किलो/हे. जमीन उपलब्ध असल्यास रासायनिक खत शिफारशीच्या 25 टक्के कमी द्यावे. सेंद्रिय कर्ब 1.01 टक्केपेक्षा जास्त, नत्र 700 किलो/हे. पेक्षा जास्त, स्फुरद 81 किलो/हे. पेक्षा जास्त व पालाश 360 किलो/हे. पेक्षा जास्त जमीनीत उपलब्ध असल्यास शिफारशीच्या 50 टक्के रासायनिक खताची कमी मात्रा द्यावी. पंरतु  जमिनीत उपलब्ध असलेले नत्र, स्फुरद व पालाश पिकांना योग्य त्या स्वरुपात उपलब्ध होण्याकरीता जिवाणू संवर्धन रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, पीएसबी व केएमबीची बिजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे करणे आवश्यक आहे.


माती परीक्षण करुन शेतात उपलब्ध घटकांचे प्रमाणानुसार रासायनिक खताची योग्य मात्रा ठरवुन देणे शक्य होवुन उत्त्पादन वाढीसह संतुलित खत वापरामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. शेतकरी बांधवांनी जमिनीची आरोग्य तपासणी करुन रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos