पाचव्या दिवशी उपोषणकर्ते ॲड. नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावली : माना समाजात असंतोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर : 
आदिवासी माना जमातीच्या समस्या संदर्भात शासन व प्रशासनाने परिपत्रक काढावे, या मागणीसाठी आदिवासी माना समाज कृती समिती द्वारे लोकशाहीच्या मार्गाने उपोषण हे शस्त्र  हाती घेऊन ॲड. नारायण जांभुळे यांनी चिमूर तहसील कार्यालयासमोर २६ फेब्रुवारी पासुन  आमरण उपोषण सुरू केले.  मात्र शासनाने व लोकप्रतिनिधींनी अद्याप उपोषणाची दखल घेतली नाही.  त्यामुळे सतत पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने जांभुळे यांना तालुका रुग्णालयात दाखल केले. 
 आदिवासी माना जमातीच्या मागण्या संदर्भात  मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मंत्रालयात सचिव स्तरीय  बैठक घेण्यात आली होती . यावेळी मागण्या मान्य करण्यात आल्या. घेण्यात आलेल्या निर्णयाचे शासकीय परिपत्रक काढण्यासाठी संबंधितांना कालमर्यादा ठरवून देण्यात आली. मात्र सदर शासकीय परिपत्रक अजुनही काढण्यात आलेले नाही. हे शासकीय परिपत्रकं शासन स्तरावरून त्वरीत निर्गमित करण्याचे मागणी घेऊन माना जमातीचे ॲड. नारायण जांभुळे यांनी चिमूर येथील तहसील कार्यालयासमोर  आमरण उपोषण  सुरू केले आहे. त्याचे समर्थनार्थ समाजबांधवांनी त्याच ठिकाणी साखळी उपोषण सुध्दा सुरू केले आहे. आतापर्यंत आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे जबाबदार पदाधिकारी विविध संघटना, सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, पत्रकार, शासकीय अधिकारी भेटी दिल्या. काहींनी शुभेच्छा तर आमदार व अधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र  परिपत्रक निर्गमित होईपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही. असा अट्टाहास उपोषण कर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अजूनपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. आज उपोषणाचा ५ वा दिवस. आमरण उपोषणकर्ते ॲड. नारायण जांभुळे यांची प्रक्रुती खालावत आहे. मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने माना जमातीमध्ये असंतोष पसरत आहे. जर शासन व प्रशासनाने याची दखल घेतली नाही आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनावरच राहील अशी भुमिका जनमानसात व्यक्त होत आहे. तेव्हा तात्काळ  आदिवासी माना जमातीच्या समस्या संदर्भात शासन व प्रशासनाने परिपत्रक काढावे व न्याय द्यावा, अशी मागणी माना समाजातून जोर धरत आहेत .   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-02


Related Photos