चंदनखेडा शिवारात इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
तालुक्यातील चंदनखेडा रस्त्याच्या कॅनलजवळ इसमाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मृतदेहाच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
भाउराव बोंडकुजी नन्नावरे (६०) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव खु. येथील भाउराव नन्नावरे हे चंदनखेडा रस्त्याच्या कॅनलजवळील शेतात नेहमीप्रमाणे जागलीसाठी गेले होते. १ मार्च रोजी सकाळ होवूनही ते परत आले नाही. यामुळे मुलाने शेतात जावून पाहणी केली. त्याला वडीलांचे प्रेत कॅनलजवळ आढळून आले. याबाबत शेगाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकाच्या डोक्यावर खोलवर जखमा आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी काही इसमांना बोलावून चैकशी केली. घटनास्थळी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांनी भेट दिली. घटनेचा तपास चंद्रपूर येथील गुन्हे शोध पथक, शेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, वरोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-02


Related Photos