रोजगारासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे : नगराध्यक्षा पिपरे


- प्रधानमंत्री कुशल केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली
: राज्य व देशभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. रोजगार प्राप्त करण्यासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीताताई  पिपरे यांनी केले.
येथील इंदिरा गांधी चौकातील प्रधानमंत्री कुशल केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा योगीताताई  भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, नीलेश खांडेकर, महेश जेंगठे, समीर पाठ, नितीन तारनेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नगराध्यक्ष म्हणाल्या, स्वत:ला काय बनायचे आहे, हे ध्येय निश्चित करून त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करावे. निश्चित केलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करताना कितीही संकट आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची तयारी ठेवावी. स्किल इंडिया कार्यक्रमांतर्गत युवकांना विविध प्रकारचे रोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. कंपन्यांमध्ये अगदी सुरुवातीला कमी वेतन दिले जाते. परंतू सुरुवातीला कितीही वेतनावर काम करण्याची तयारी ठेवून त्याच ठिकाणी स्वत:चे कौशल्य विकसित करावे, असे नगराध्यक्ष म्हणाल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना, सरकारी नोकरी मिळाली नाही तरी स्वत:चा उद्योग सुरू करून तो वाढविण्याची ताकद युवकांनी ठेवली पाहिजे. बेरोजगारी कमी करणे, हे पंतप्रधानांचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे प्रशिक्षण देण्यावर केंद्र शासन विशेष लक्ष देत आहे. प्रशिक्षणाचा उपयोग स्वत:चा उद्योग थाटण्यासाठी किंवा नोकरी मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
स्किल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात प्रधानमंत्री कौशल्य केंद्र चालविले जात आहे. या केंद्राअंतर्गत फूड अ‍ॅण्ड बेवरेज, वेअर हाऊस पॅकर्स, सीसीटीव्ही इन्स्टालेशन अ‍ॅण्ड टेक्निशियन, कम्पुटींग अ‍ॅण्ड पेरफेरल्स फिल्ड टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन या पाच प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थ्यांना संगणक, व्यक्तीमत्त्व विकास तसेच स्पोकन इंग्लिशचेही प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत ७०० युवकांना प्रशिक्षण दिले असून ३४० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-02


Related Photos