गडचिरोलीत आढळले दूर्मिळ काळे गिधाड


- गिधाडमित्र अजय कुकडकर यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात वनविभागाच्या वतीने गिधाडांचे संवर्धन व संरक्षण केले जात आहे. वनविभागाने जनजागृतीसुध्दा मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यामुळे नागरीकांमध्ये गिधाड पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण होत आहे. अशातच जिल्ह्यात नवीनवीन प्रजातीच्या गिधाडांची नोंद केली जात आहे. नुकतेच गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात ‘काळे गिधाड’ म्हणजे सिनेरीस व्हल्चर आढळून आला असल्याची माहिती गिधाडमित्र तथा वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी दिली आहे.
गडचिरोली नजीकच्या बोदली परिसरात गिधाडांचे उपहारगृह नव्यानेच सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मेलेली जनावरे टाकून गिधाडांना अन्न पुरविले जात आहेत. पहिल्यांदाच मृत जनावर टाकल्यानंतर अजय कुकडकर यांना चार दिवसांनी काही गिधाड पक्षी निदर्शनास आले. यामध्ये एक काळ्या रंगाचा मोठ्या आकाराचा पक्षी आढळून आला. या पक्ष्याचे निरीक्षण करण्यासाठी दोन ते तीन दिवस परिसरात शोधमोहिम राबविण्यात आली. यावेळी गिधाडमित्र अजय कुकडकर, मनोज पिपरे आणि छायाचित्रकार विपुल उराडे यांना सदर पक्षी निदर्शनास आला. त्याचे निरीक्षण केले असता ते  दूर्मिळ असलेले व आपल्या भागात आढळून न येणारे काळे गिधाड असल्याचे आढळून आले.
सिनेरीस व्हल्चर हा गिधाडांच्या इतर जातींपैकी सर्वात मोठ्या आकाराचा गिधाड असून त्याचे वजन १३ ते १४ किलो इतके असते. मृत जनावरांची चामडी काढण्याचे काम तो करतो. त्याला शिकारी पक्षी म्हणूनही ओळखले जाते. हा पक्षी जम्मू - कश्मिर, पाकीस्तान, अफगाणिस्तान या प्रदेशात वास्तव्य करतो. पहिल्यांदाच या पक्ष्याची गडचिरोली जिल्ह्यात नोंद झाल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे. 
वनविभागाच्या वतीने बोदली परिसरात तयार केलेल्या उपहारगृहामुळे गिधाड पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे. या उपहारगृहावर मृत जनावर टाकल्यानंतर चार दिवसांनी तब्बल २८  गिधाड आढळून आल्याची नोंद करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-28


Related Photos